घागरा चोलीतील अंबाबाई.. -भाविकातून तीव्र प्रतिक्रिया
By admin | Published: June 10, 2017 03:38 PM2017-06-10T15:38:24+5:302017-06-10T15:38:24+5:30
सोशल मिडियावरही टिका
आॅनलाईन लोकमत कोल्हापूर, दि. १0 : श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाबाबत आम्ही किती संवेदनशील आहोत ते मागील आठवड्यातच जाहीर करणाऱ्या पूजाऱ्यांनी शुक्रवारच्या पूजेत देवीला घागरा चोली नेसवून देवीच्या धार्मिक परंपरांबद्दल आणि भक्तांच्या भावनांबद्दल असंवेदनशिलतेचे दर्शन घडवले आहे. या पूजेबद्दल कोल्हापूरकरांनी अत्यंत तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अंबाबाई मंदिराचा गाभारा पूजाऱ्यांच्या अधिकारात आहे त्यामुळे ते गाभाऱ्यात करतील त्या सगळ््या गोष्टी योग्यच असा अलिखित नियम कोल्हापूरकरांच्या माथी मारण्यात आलेला आहे. असाच प्रकार करत शुक्रवारी साडीला सुट्टी देत पूजाऱ्यांनी देवीला पिवळ््या घागरा चोलीतील पोरकट वयातील मुलीचाच पेहराव करुन भाविकांपुढे आणले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. नंतर पूजाऱ्यांकडून कुठल्याशा भाविकाने दिलेली ३५ हजाराची घागरा चोली आहे असे सांगण्यात आले.
प्रत्येक स्त्री देवतेच्या सालंकृत पूजेचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते तीच त्या देवीची ओळख असते. आदिशक्ती असलेल्या अंबाबाईची काठापदराच्या साडीतील सालंकृत खडी पूजा ही मुख्य पूजा. सण वाराच्या औचित्याने त्यात बदल केले असले तरी साडी या मुळ पेहरावाला धक्का लावण्यात आला नाही. पण वार असलेल्या पूजाऱ्यांना त्याचेही भान राखावेसे वाटले नाही. गाभाऱ्यात कमीत कमी फळांचा वापर करा असे सांगितलेले असताना काही महिन्यांपूर्वी एका भाविकाने द्राक्षं दिली म्हणून द्राक्षांच्या बागांची पूजा बांधण्यात आली. एकाने सिताफळ दिले म्हणून अंबाबाईला सिताफळाच्या वनात बसवण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी देवीच्या गुडघ्यापर्यंत आंब्याच्या राशी ठेवण्यात आल्या. नवरात्रौत्सवात ठरवून दहा दिवस देवीची कमळातील पूजा बांधण्यात आली.
सोशल मिडियावरही टिका
दुपारच्या पूजेनंतर अंबाबाईचे घागरा चोलीतले फोटो व्हॉटस-अपसारख्या सोशल मिडियावर पडले. त्यावर आज घागरा चोली, उद्या पंजाबी ड्रेस आणि भविष्यात आधुनिक कपडे परिधान केलेली अंबाबाई पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको अशा प्रतिक्रिया टाकण्यात आल्या.
श्रीपूजकांनी भक्तांच्या संयमाचा अंत पाहू नये : शिवसेनेचा इशारा
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीला शुक्रवारी कुणातरी मूर्ख भक्ताने दिलेला ड्रेस परिधान करण्यात आला. हा प्रकार अत्यंत मूर्खपणाचा असून श्रीपूजकांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा भविष्यात या घटनांविरोधात कोल्हापुरकरांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे. पूजाऱ्यांनी शुक्रवारी अंबाबाईच्या मूर्तीला घागरा चोली हा ड्रेस घालून पूजा बांधल्यानंतर भाविकांमधून याबद्दल अत्यंत तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.
शनिवारी शिवसेनेचे संजय पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई हे शक्तीस्थान आहे मात्र कुणाच्या तरी चुकांमुळे मंदिराची बदनामी होत असून ते निषेधार्ह आहे. आई अंबाबाईची पूजा पारंपारिक साडी-खण असताना देवीला ड्रेस परिधान करण्यात आला. अशा प्रकारची घटना तिरुपती किंवा अजमेर येथील धार्मिक स्थळ किंवा चर्चमध्ये घडली असती तर याचा उद्रेक देशभर झाला असता. हिंदूच्या संयमाचा अंत यापुढे कुणीही पाहू नये. कायद्याचे व नियमाचे आणि देवीची बदनामी होणार नाही याचे भान जसे आम्ही ठेवतो तसेच श्रीपूजकांनीही ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडण्यास वेळ लागणार नाही.