आंबोलीत युवक, युवतीचा मृतदेह महिनाभर दरीतच, घटनास्थळावरील दुचाकी सावर्डे पाटणकर येथील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:39 AM2017-11-17T01:39:53+5:302017-11-17T01:40:45+5:30
आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेले युवक व युवतीचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आले.
आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेले युवक व युवतीचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह साधारणपणे एक महिन्यापूर्वीचे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एक महिन्यापूर्वी पोलिसांना कावळेसादजवळ एक दुचाकीही मिळाली होती. ही दुचाकी सावर्डे पाटणकर
(ता.राधानगरी) येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या दुचाकीवरू संबंधितांना मृतदेहांची खात्री करण्यास आंबोलीला बोलविले आहे.
गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोलीतील कावळेसाद येथील दरीतून काढत असताना तेथे आणखी दोन मृतदेह असल्याचे आपत्कालीन पथकाने पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी आपत्कालीन पथकाला दरीत उतरून मृतदेह शोधण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे सांगेलीतील आपत्कालीन टीम दरीत उतरली होती.
सकाळपासून या पथकाने शोधमोहीम हाती घेतली. त्यांना सायंकाळी हे मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र, मृतदेहाचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. दोन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. आपत्कालीन पथकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक मृतदेह युवकाचा, तर दुसरा युवतीचा असल्याचे सांगितले. मृतदेहाच्या अवशेषांवर फक्त कपडेच होते. सायंकाळी उशिरा मृतदेह दरीतून वर काढल्यानंतर वैद्यकीय तपासणी घटनास्थळीच करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी एक दुचाकी या परिसरात आढळून आली होती. या दुचाकीवरून युवक व युवती आली होती. या दोघांनाही परिसरात पाहिले आहे. हे दोघे आंबोलीतील एका हॉटेलात राहिल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. ही दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील सुरेश श्रावण मोरे यांच्या नावावर आहे. ती दुचाकी मुरगूड पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरेश मोरे यांना आंबोली येथे बोलविले आहे. ते आल्यानंतरच नेमकी वस्तूस्थिती काय ती कळू शकेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस हेडकाँस्टेबल विश्वास सावंत, अमोद सरंगले, प्रकाश कदम, तानाजी देसाई आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तर सांगेली येथील आपत्कालीनचे बाबल आल्मेडा, नार्वेकर आदींनी शोध घेतला आहे.
नातेवाइकांसह मुरगूड पोलीस आंबोलीत
मुरगूड : कावळेसाद पॉर्इंट येथे सापडलेल्या दोन मृतदेहा पैकी पुरुष असणारा मृतदेह सावर्डे पाटणकर
(ता.राधानगरी) येथील एका तरूणाचा असण्याची शक्यता मुरगूड पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता तरूणाच्या नातेवाइकांबरोबर मुरगूड पोलीस गुरुवारी आंबोलीत रवाना झाले आहेत. याच ठिकाणी बेपत्ता तरुणाची मोटारसायकल सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कावळेसाद दरीमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती मुरगूड पोलिसांना मिळाली होती. आज, शुक्रवारी सावंतवाडी येथे त्या मृतदेहांची तपासणी होणार आहे.
सावर्डे पाटणकर (ता. राधानगरी) येथील सुरेश श्रावण मोरे यांनी मुरगूड पोलिसांत आपला मुलगा श्रीधर हा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार ७ आॅक्टोबरला मोरे यांच्या टेम्पोमधील डिझेल संपले असा फोन श्रीधर यांच्या वडिलांना आला. डिझेल भरण्यासाठी श्रीधर घरातून पैसे घेऊन बिद्री येथे त्या चालकाला देण्यासाठी गेला होता. जाताना तो घरातील मोटारसायकल (एम.एच. ०९ ईएच ७४०२) घेऊन गेला होता. बिद्री येथे गेलेला मुलगा परत आलाच नाही म्हणून सुरेश मोरे यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली होती.
तिसरी घटना
आंबोलीत गेल्याच आठवड्यात सांगली येथील अनिकेत कोथळेचा मृतदेह आढळला होता. त्याला पोलिसांनी जाळून मारले होते, तर चार दिवसांपूर्वी कावळेसाद येथील दरीत गहहिंग्लज येथील शिक्षकांचा मृतदेह आढळून आला. त्याची अमानुषपणे हत्या करून मृतदेह दरीत टाकला होता, तर गुरुवारी कावळेसाद येथेच युवक युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. आठवड्यात वेगवेगळ्या तीन घटना घडल्या आहेत.
आंबोलीतील हॉटेलात केले होते वास्तव्य
या युवक व युवतीने आंबोलीत एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
त्यावरून पोलिसांनी शोध घेतला तर ते साधारणत: एक महिन्यापूर्वी हॉटेलमध्ये आले होते. त्यांची दुचाकीही त्यांनी ओळखली आहे.