अंबाबाई मंदिराचा होणार जीर्णोद्धार, तीन कोटींची तरतूद : देवस्थान समितीचे बजेट मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:52 PM2019-03-01T13:52:17+5:302019-03-01T13:55:59+5:30
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जोतिबा मंदिर जीर्णोद्धार, अंबाबाई भाविकांसाठी भक्त निवास, अन्नछत्र, नव्या इमारतीची बांधणी असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जोतिबा मंदिर जीर्णोद्धार, अंबाबाई भाविकांसाठी भक्त निवास, अन्नछत्र, नव्या इमारतीची बांधणी असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नव्या वर्षातील विविध उपक्रमांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. अंबाबाई मंदिराच्या बांधणीचे दगड निखळणे, भग्न होत असलेल्या शिळा, दगडी बांधकामावर लावण्यात आलेला काळा रंग, आॅईल पेंटिंग, ठिकठिकाणी लोखंडी रेलिंग यासह मंदिराच्या दगडी बांधकामाचे जतन व संवर्धन हा विषय यंदा देवस्थान समितीच्या मुख्य विषयपत्रिकेवर आहे. त्यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या जोतिबा मंदिर विकास आराखडा राबविण्यात येत आहे. दुसरीकडे, देवस्थान समितीनेही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी १२ कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. नृसिंहवाडी येथे देवस्थान समितीची जागा आहे; तेथेही भक्त निवास बांधण्यात येणार आहे.
याशिवाय ताराबाई रोडवरील निंबाळकर यांची जागा खरेदी करण्याचा रखडलेला प्रस्ताव मार्गी लावून तेथे भाविकांसाठी भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. यापूर्वीच्या समिती कार्यकारिणीने महालक्ष्मी बँकेची जागा खरेदी केली आहे. या जागेवर समितीचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.
मंदिराच्या परिसरात कारंजामागे देवस्थान समितीची इमारत आहे. या ठिकाणी भाविकांच्या सोईसुविधांसाठी नवी इमारत उभारण्याचा विचार आहे. देवस्थान समितीतर्फे सध्या समितीच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या बैठकीस देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, बी. एन. पाटील-मुगळीकर, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा उपस्थित होते.
- निंबाळकर यांच्या जागेची खरेदी व येथे अन्नछत्र- भक्त निवास उभारणी : १८ कोटी
- पॅथॉलॉजी लॅब : १६ कोटी
- अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार : ३ कोटी
- अंबाबाई मंदिरातील उत्तर बाजूला भाविकांना सोईसुविधांसाठी इमारत बांधणी : ५ कोटी
- जोतिबा मंदिर जीर्णोद्धार : १२ कोटी
- नरसोबाची वाडी येथे भक्तच निवास : साडेचार कोटी
- देवस्थान जमिनींचा सर्व्हे : ८ कोटी
जबाबदारी पुरातत्त्व खात्याची
प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धनाचे काम खरे तर पुरातत्त्व खात्याच्या वतीने केले जाते. मात्र शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे अद्याप अंबाबाई मंदिराचा समावेश राज्य संरक्षित स्मारकामध्ये झालेला नाही. त्यामुळे देवस्थान समितीच अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे.