उत्सवी वातावरणासाठी आंबेडकर जयंतीचा उपयोग नको : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:44 PM2023-04-11T12:44:20+5:302023-04-11T12:45:22+5:30

समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधा

Ambedkar Jayanti should not be used for festive atmosphere says Union Minister Ramdas Athavale | उत्सवी वातावरणासाठी आंबेडकर जयंतीचा उपयोग नको : रामदास आठवले

उत्सवी वातावरणासाठी आंबेडकर जयंतीचा उपयोग नको : रामदास आठवले

googlenewsNext

कोल्हापूर : गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सामान्य माणसांबरोबरच जगभरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. केवळ नाचगाण्यासाठी आणि उत्सवी वातावरणासाठी उपयोग न करता समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या निर्माण चौकातील भीम महोत्सवाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो होते. यावेळी भारतात होणाऱ्या सोळाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले.

यावेळी आठवले म्हणाले की, बौद्ध समाज जरी येथे नसला तरी बुद्धांना मानणारे घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी आहेत, हीच त्यांच्या विचारांची ताकद आहे. बाबासाहेबांनी या देशात माणसांना जोडणारे माणुसकीचे कार्य केले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सतीश म्हाळगे यांनी प्रास्तविक करताना रामदास आठवले यांच्या नावे ट्रस्टमार्फत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुरात उभारणार असल्याचे जाहीर केले. संघटक सचिव शहाजी कांबळे, सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भदंत राहुल बोधी महाथेरो, आर. संबोधी, अण्णासाहेब वायदंडे, रूपाताई वायदंडे, सचिव मंगल म्हाळगे, माजी नगरसेवक दुर्वास कदम, राजेश ठिकपुर्ले, राहुल सडोलीकर उपस्थित होते. यावेळी कबीर नाईकनवरे यांनी गीतांचा कार्यक्रम सादर केला.

गर्दी नसल्याने कार्यकर्त्यांना खडसावले

आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करताना कार्यक्रमाला गर्दी नसल्याबद्दल कानउघाडणी करून कार्यकर्त्यांनाही थेट भाषणातून खडसावले. एखाद्या आंबेडकरी विचारांच्या वस्तीत जरी कार्यक्रम ठेवला असता तरी हजार लोक जमले असते, असे त्यांनी सुनावले.

Web Title: Ambedkar Jayanti should not be used for festive atmosphere says Union Minister Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.