आंबेडकरी चळवळीची वाटचाल आत्मघाताकडे !
By admin | Published: August 2, 2016 12:26 AM2016-08-02T00:26:26+5:302016-08-02T01:00:06+5:30
नवीन फ्रंटची गरज : राजकीय आत्मभान परिषदेतील सूर; अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य
कोल्हापूर : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ना नेत्यांचे, ना नेते कार्यकर्त्यांचे ऐकतात; अशी राजकीय सद्य:स्थिती आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीची वाटचाल ही आत्मघाताकडे सुरू आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांना तोंड देण्यासाठी समविचारी पक्षांतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवीन फ्रंट निर्माण करण्याची गरज आहे, असा सूर सोमवारी कोल्हापुरात राजकीय आत्मभान परिषदेत उमटला.
या परिषदेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, बहुजन समता पार्टीचे सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने, बहुजन समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे, बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ही परिषद शाहू स्मारक भवनात झाली.
डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी नव्याने फ्रंट निर्माण केले पाहिजे तसेच राज्यातील डिसेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या २९७ नगरपालिका व फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या २७ जिल्हा परिषदा निवडणुका या नव्याने होणाऱ्या फ्रंटच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात.
डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, प्रथम जातिव्यवस्थेचा अंत केला पाहिजे. राजकारण आणि राजकारण्यांना न भिता आपण त्याने भिडले पाहिजे. त्याचबरोबर आज पैशांनी निवडणूक जिंकू शकतो. फ्रंट झाले तर मी तुमच्यासोबत असेन.
मच्छिंद्र कांबळे म्हणाले, भाजप हा पक्ष नसून आरएसएसची दुसरी शाखा आहे. सर्व निर्णय नागपूरहून होतात. कन्यागत महापर्व, कुंभमेळ्याला सरकार निधी देते पण, सर्वसामान्य माणूस आणि शेतकरीवर्ग मूलभूत गरजांपासून वंचित आहे. जातीयता वाढत आहे हे धोकादायक आहे. त्यामुळे राजकीय पर्याय उभे करणे आवश्यक बनले आहे. सत्तेच्या जवळ जाण्यासाठी फ्रंट तयार व्हायला पाहिजे. यासाठी आंबेडकरी चळवळीतील गटांनी गट-तट न मानता एकत्र आले पाहिजे. भाजप-शिवसेनेशी लढण्यासाठी आंबेडकर चळवळीतील विविध पक्षांना एकत्र करून चर्चा केली पाहिजे प्रसंगी समविचारी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांबरोबर चर्चा करून त्यांना सामावून घेतले पाहिजे तरच सत्तापरिवर्तन होईल.
यावेळी डॉ. ज. रा. दाभोळे यांनीही मत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख यांनी स्वागत तर निमंत्रक अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. परिषदेस सोलापूरचे सुबोध वाघमारे, रणजित कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. चिंतामणी कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)