आंबेडकर केवळ दलित नेते नसून सर्वश्रेष्ठ भारतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 12:51 AM2016-05-22T00:51:55+5:302016-05-22T00:51:55+5:30
नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन : शिवाजी विद्यापीठ आयोजित डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे नेते म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय असून, त्यांचे भारतीय समाजाप्रती एकूण राष्ट्रीय योगदान पाहता ते सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असेच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित पुढारीचे संस्थापक डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य’ या विषयावर ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. व्यासपीठावर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.
यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत की, मी प्रथमत: भारतीय आहे, नंतरही भारतीय आहे आणि अंतिमत:ही भारतीय आहे. स्वत:च्या भारतीयत्वाविषयी इतक्या नि:संदिग्धपणे आणि अभिमानपूर्वक प्रतिपादन करणारा नेता या देशात दुसरा झाला नाही. या तीव्रतर भारतीयत्वाच्या जाणिवेतून भारतीय राज्यघटनेची अमोल देणगी त्यांनी भारतीय समाजाला प्रदान केली, हे त्यांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, याची जाणीव आपण बाळगली पाहिजे. डॉ. आंबेडकर हे दलितांचे नेते, कैवारी होतेच, तसेच राज्यघटनेचे शिल्पकारही होते; पण त्यापुढे जाऊन ते एक थोर विधिज्ज्ञ आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञही होते. बाबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास केला असला तरी त्यांचे सर्व प्रबंध आणि पदव्या अर्थशास्त्रातील आहेत. त्यामुळेच ते भारताचे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असल्याचे स्पष्ट होते.
डॉ. जाधव म्हणाले, ‘बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भातील भूमिकांमुळे वेळोवेळी राजकीय आणि तात्त्विक मतभेद उद्भवले. तरीही बाबासाहेबांचा भारतीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महात्मा गांधी यांच्या आग्रहामुळेच होऊ शकला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दोघांमधील संबंध कटुतेचे असले तरी, व्यक्तीपेक्षा देश मोठा, हा संदेश देणारी कृती गांधीजींची राहिली, हे लक्षात घेतले पाहिजे.
विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. रसिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ( प्रतिनिधी )
२५ व्याख्यानांचा ग्रंथ
डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आपले मौलिक विचार प्रकट केले आहेत. यामधील निवडक २५ व्याख्यानांचा समावेश असणारा ग्रंथ शिवाजी विद्यापीठाच्यावतीने प्रकाशित करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केली.