आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला ११७ वर्षे : साताºयात प्रवेश घेतला होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:13 AM2017-11-07T01:13:26+5:302017-11-07T01:20:14+5:30
बाहुबली : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी७ नोव्हेंबर १९०० ला पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतला.
भरत शास्त्री ।
बाहुबली : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी७ नोव्हेंबर १९०० ला पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतला. तो दिवस महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर्षी या घटनेला ११७ वर्षे पूर्ण होत आहेत.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० ला शाळेत प्रवेश केला होता. शाळेच्या एक नंबर रजिस्टरमध्ये १९९४ क्रमांकाला त्यांचे नाव आहे. त्या ठिकाणी भीवा रामजी आंबेडकर असे नाव आहे. या शाळेत ते इ.स. १९०४ पर्यंत होते. विशेष म्हणजे रजिस्टरवर मोडी लिपीमध्ये डॉ. आंबेडकरांची सहीदेखील आहे. शाळा बदलताना दाखला द्यायच्या शेºयामध्ये ‘नो ड्यूस’ असा शेरा मारला आहे. ही शाळा इंग्रजी माध्यमाची होती. त्यामुळे सर्व नोंदी इंग्रजीमध्येच आहेत.
राज्यभरातून हा महत्त्वाचा दस्तऐवज पाहावयास नागरिक येतात. त्यामुळे ८ ते १० वर्षांपूर्वी एका संस्थेने त्याचे लॅमिनेशन करून दिले आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या शालेय जीवनाला ज्या शाळेतून सुरुवात झाली ती शाळा म्हणजे सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल ही शाळा सातारा जिह्यातील पहिली शाळा आहे. शहराचा आणि सातारा जिल्ह्याचा शैक्षणिक प्रवास या शाळेतूनच सुरू झाला. या शाळेची स्थापना १८५१ ला झाली. ही इंग्रजी शाळा साताºयाचे थोरले प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरूझाली. शाळा पूर्वी रंगमहालात भरत होती. सन १८७१ मध्ये शाळेचे हायस्कूलमध्ये रूपांतर झाले. १८७४ साली ही शाळा सरकारी शाळा म्हणून प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरू झाली. आजअखेर ही सातारा शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळा राजवाड्यात भरते. ही शाळा, रजिस्टरमधील त्यांची मोडीलिपीतील सही, त्यांचे नाव पाहण्यासाठी अनेक अभ्यासक, काहीजण कुतूहल म्हणून तर अनेक लोक येत आहेत.
डॉ. आंबेडकरांनी ज्या शाळेत प्रवेश घेतला त्या शाळेत काम करण्यास मिळते हे भाग्याचे आहे. त्यांच्या मूळ नोंदी असलेले मुख्य रजिस्टर आम्ही अत्यंत चांगल्याप्रकारे जतन करून ठेवले आहे. खरोखरच ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.
— एस. जी. मुजावर
प्रभारी मुख्याध्यापिका,
प्रतापसिंह हायस्कूल, सातारा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचे रजिस्टर आजही उपलब्ध आहे.