‘आंबेओहळ’साठी ‘चित्री’च्या जमिनी १४१ भूखंड रखडले : ताबाच नसल्याने लिंगनूर, कडगाव येथील गावठाणे चिकोत्रा प्रकल्पासारखी वापराविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:36 AM2018-01-19T00:36:24+5:302018-01-19T00:36:35+5:30
उत्तूर : एकीकडे जमीन वाटपाची प्रक्रिया रखडली असताना गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर, कडगाव येथील १४१ भू-खंड वाटप प्रक्रिया रखडली आहे. वीस वर्षांनंतरही कुणाला कोठे भूखंड
रवींद्र येसादे ।
उत्तूर : एकीकडे जमीन वाटपाची प्रक्रिया रखडली असताना गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर, कडगाव येथील १४१ भू-खंड वाटप प्रक्रिया रखडली आहे. वीस वर्षांनंतरही कुणाला कोठे भूखंड मिळणार याचा ठावठिकाणा नाही. १८ नागरी सुविधा मंजूर झालेल्या भूखंडावर शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र, ताबाच नसल्याने चिकोत्रा प्रकल्पासारखी ही गावठाणे पडून आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी चित्री धरणासाठी आरक्षित केलेल्या जमिनीवर ए. आय. ए. होणे प्रलंबित आहे.
लिंगनूर येथे ६० भूखंड पाडले आहेत. रस्ते, गटर्स, शौचालये, शाळा इमारत बांधून दोन वर्षे झाली आहेत. भूखंडाचा व इमारतीचा वापर नसल्याने दुरवस्था सुरू झाली आहे. लिंगनूर येथील भूखंडामध्ये आंबेओहळ नाल्यामधून जॅकवेलची उभारणी करून भूखंडाच्या ठिकाणी पाणी आणण्यात आले आहे. समाजमंदिर, अंगणवाडी इमारत, शौचालय, वीज, आदींची उभारणी केली आहे. रस्त्यांचे खडीकरणही झाले आहे.
मुमेवाडी-कडगाव मार्गावर असणारे कडगाव हद्दीतील ८१ भूखंड धारकांना द्यायचे आहेत. तेथेही लिंगनूर वसाहतीसारख्या सुविधा उपलब्ध आहे. मात्र, मुख्य रस्त्याची दुरवस्था आहे. इमारती वापराविना पडून असल्याने त्वरित प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप होणे आवश्यक आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनींचे वाटपाचे नियोजनही कासव गतीनेच आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उत्तूर, करपेवाडी, आर्दाळ या गावांमधील पात्र प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध जमीन ४४.४९. हेक्टरआहे. त्याचे वाटप प्रांताधिकारी कार्यालय गडहिंग्लज स्तरावरसुरू असल्याचे सांगण्यात येते.
तर गडहिंग्लज व बेकनाळ असेमिळून ७२.८० क्षेत्राचे व चित्री लाभक्षेत्रातून भडगाव, बेळगुंदी, गडहिंग्लज, दुंडगे, हसूरचंपू, हेब्बाळ, नूल, जरळी, हिरलगे, हरळी या ११ गावांतील भू-संपादन नवीन कायद्यानुसार ए.आय.ए. होणे प्रलंबित आहे. या जमिनी लवकर संपादित झाल्यास धरणग्रस्तांना वाटप होऊ शकतात.
भूखंडांचा आराखडा तयार नाही
भूमीहिन धरणग्रस्तांचे गावठाण संदर्भात फॉर्म भरून घेतले. कोणाला कोणता भूखंड किती स्वे. चा मिळणार याची माहिती धरणग्रस्तांना नाही.शेजारील चिकोत्रा मध्यम प्रकल्पाच्या वसाहतीची दुरवस्था झाली आहे तशी अवस्था लिंगनूर, कडगाव येथील भूखंडांची नको अशी व्यथा धरणग्रस्त मांडत आहेत. जखेवाडी येथेही धरणग्रस्तांना भूखंड देण्याचे नियोजन आहे. मात्र, त्याचा कोणताही आराखडा तयार नाही. मात्र, धरणग्रस्तांसाठी आरक्षित आहे.
लिंगनूर येथील भूखंड सपाट जागेवर आहेत, तर कडगाव येथील भूखंड चढ-उताराचे असल्याने सपाटीकरण
करून देणे गरजेचे आहे; मात्र तसे कोणतेही नियोजन नसल्याने धरणग्रस्तांनी नापसंती व्यक्त केलीआहे.
दोन्ही भूखंडाचे मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते खडी-डांबरीकरणाने जोडणे गरजचे आहे. मात्र, खडीकरणाची तरतूद असल्याने डांबरीकरण नाही. भूखंड ताब्यात मिळेपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय होणार आहे.
लिंगनूर येथील भूखंडावर प्रकल्पग्रस्तांसाठी निर्माण केलेल्या सुविधा, तर दुसºया छायाचित्रात कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे भूखंडावरील रस्ता व अन्य कामे.