आंब्याच्या सरपंच साक्षी भिंगार्डे अपात्र: जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:33 PM2019-02-19T16:33:00+5:302019-02-19T16:34:03+5:30
जातीचे वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आंबा (ता. शाहुवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी दिवाकर भिंगार्डे यांचे पद तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अपात्र ठरविले आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच दिले आहेत.
कोल्हापूर : जातीचे वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आंबा (ता. शाहुवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी दिवाकर भिंगार्डे यांचे पद तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अपात्र ठरविले आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच दिले आहेत.
आंबा ग्रामपंचायतीची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. सरपंचपद महिला मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. माजी सरपंच प्रेरणा दिलीप बेंडके यांनी जुलै २०१७ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.यानंतर साक्षी भिंगार्डे यांनी सरपंच पदासाठी दावा केला. त्यांची ११ आॅगस्ट २०१७ला त्यांची निवड झाली. त्यावेळी त्यांनी वैश्य-वाणी जातीचा दाखला जोडला होता.
नवीन नियमानुसार एक वर्षाच्या आत म्हणजे ११ आॅगस्ट २०१८पर्यंत जातीचा दाखला देणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी वेळेत वैधता प्रमाणपत्र सादर न करता ते मुदतीनंतर सादर केले. याबाबत तळवडे-आंबा(ता.शाहुवाडी) येथील अनिल वायकुळ यांनी तत्कालिन जिल्हाधिकारी सुभेदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.
त्यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंकडून वकिलांनी युक्तीवादही केला. परंतु जातवैधता प्रमाणपत्र हे वेळेत सादर न केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी सुभेदार यांनी भिंगार्डे यांचे पद रद्द केले. याबाबतचे निर्देश शाहुवाडी तहसिलदारांनाही दिले आहेत.