ऊर्जामंत्र्यांच्या सवलतीच्या घोषणेने संदिग्धता

By admin | Published: January 21, 2016 12:04 AM2016-01-21T00:04:34+5:302016-01-21T00:28:18+5:30

रात्रीचा वीज वापर : पूर्वीपासूनच सवलत, मग आता आणखी दर कमी करणार काय?

Ambiguity | ऊर्जामंत्र्यांच्या सवलतीच्या घोषणेने संदिग्धता

ऊर्जामंत्र्यांच्या सवलतीच्या घोषणेने संदिग्धता

Next

इचलकरंजी : राज्यातील जे उद्योग विजेचे ‘टाईम आॅफ डे’ (टीओडी) मीटर वापरतात, त्यांना महावितरण कंपनीकडून रात्रीच्या वीज वापरावर दराची सवलत दिली जात आहे. गेली पाच वर्षे सवलत घेणारे अनेक लघू व बडे उद्योग आहेत. असे असताना रात्रीच्या वेळेला कमी दरात वीजपुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कोणत्या अर्थाने दिली गेली, की आणखीन जादा सवलत मिळणार? असा प्रश्न येथील उद्योगजगतामध्ये विचारला जात आहे.
औद्योगिक विजेचे दर कमी करण्यासाठी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री बावनकुळे, आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील उद्योजकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी उद्योगांना रात्रीच्या वीज वापरावरील बिलात सवलत देण्याची ग्वाही दिली, असे वृत्त बुधवारी समजताच येथील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली.
सध्या टीओडी मीटर वापरणाऱ्या उद्योगांसाठी रात्री दहा ते सकाळी सहा या आठ तासांतील वीज वापरावर सवलत मिळते. साधारणत: वीज वापराच्या फरकाप्रमाणे ही सवलत एक रुपये ते सव्वा रुपये प्रतियुनिट असून, दिवसभराच्या वीज वापरासाठी सवलतीचा दर सरासरी ४० पैसे आहे.
ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेविषयी आश्चर्य व्यक्त करीत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, गेल्या चौदा महिन्यांमध्ये वीज दराच्या सवलतीबाबत अनेक घोषणा करून सरकारने वीज ग्राहकांची चेष्टा चालविली आहे, तर ऊर्जामंत्री म्हणतात, वीस टक्के वीज दर कमी करू. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये महावितरण कंपनीकडून विजेचे नवीन दरपत्रक आयोगासमोर सादर होईल. त्यावेळी रात्रीच्या दर सवलतीचा उल्लेख होतो का? याची वाट पाहावी लागेल; अन्यथा दर सवलत जाहीर झाली नाही, तर वीज ग्राहकांचे राज्यव्यापी आंदोलन उभे करावे लागेल.
यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, उद्योगांनी रात्रीच्या वेळी आठ तासांऐवजी बारा तासांची पाळी केल्यास युनिटमागे दीड रुपये असा वीज दर सवलतीचा फायदा उद्योजकांना होईल, असे ऊर्जामंत्री म्हणतात. मग शासनाला रात्रीच्यावेळी कामगारांसाठी बारा तासांची पाळी मान्य आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो. या परिस्थितीत दिवसा उद्योग बंद ठेवायचे का? याचाही खुलासा ऊर्जामंत्र्यांनी करावा, अशीही मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)


सध्या रात्री दहा ते सकाळी सहा या आठ तासांतील वीज वापरावर सवलत
शासन वीज ग्राहकांची चेष्टा करते का : होगाडे
सरकारला रात्री बारा तासांची पाळी अपेक्षित आहे का : महाजन

Web Title: Ambiguity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.