रुग्णवाहिका थेट महापालिका चौकात, आंदोलनाद्वारे प्रशासनाचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:15+5:302021-02-06T04:41:15+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी तसेच कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांनी गुरुवारी ...
कोल्हापूर : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी तसेच कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांनी गुरुवारी थेट महापालिका चौकात सायरन वाजवत रुग्णवाहिका नेऊन आंदोलन केले.
महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सुनील बागल आवळे यास प्रभाग क्रमांक ३६ येथे काम करत असताना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर संबंधित नातेवाइकांनी त्यास परस्पर रुग्णालयात नेले; परंतु प्रशासनाने मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले नाही. अधिकाऱ्यांनी त्याची साधी चौकशीसुद्धा केली नाही. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती ठीक असली तरी त्यास काम करण्यास डॉक्टरनी मनाई केली आहे. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला आहे.
गुरुवारी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी तसेच कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांनी आवळे यास महापालिकेच्याच रुग्णवाहिकेत झोपवून ती महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात सायरन वाजवत आणली. मुख्य गेटमधून रुग्णवाहिका आत आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. बराच वेळ सायरन वाजवत ठेवल्यामुळे त्याठिकाणी उपायुक्त रविकांत आडसुळ पोहोचले आणि चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यांना नातेवाइकांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आवळे यांच्या कुटुंबातील कोणाही एकाला महापालिकेच्या सेवेत घ्यावे अशी मागणी केली तसेच लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपायुक्त आडसुळ यांनी महापालिकेच्या कायदा व नियमात असेल त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
- महापालिकेची रुग्णवाहिका दिलीच कशी?-
आंदोलनासाठी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील रुग्णवाहिका वापरली गेली. त्यामुळे ही रुग्णवाहिका दिली कशी आणि कोणाच्या सांगण्यावरून दिली याची चौकशी उपायुक्त आडसुळ यांनी सुरू केली आहे. त्याची त्यांनी माहिती रुग्णालयाकडून मागविली आहे.