मतदार याद्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

By admin | Published: October 1, 2015 12:07 AM2015-10-01T00:07:09+5:302015-10-01T00:40:29+5:30

रात्रंदिवस अधिकारी कामात व्यस्त : गुरुवारी सकाळपर्यंत काम पूर्ण होणार, आयुक्तांनी घेतला आढावा

Amendment of Voter Lists | मतदार याद्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

मतदार याद्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

Next

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध करायची असल्याने प्राप्त हरकतींनुसार त्या दुरुस्त करण्याचे काम रात्रं-दिवस सुरू झाले असून आज, गुरुवारी सकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार याद्यांवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यामुळे अधिकारी हादरून गेले असून, आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दुपारपर्यंत चारही विभागीय कार्यालयांत जाऊन व्यक्तिश: कामाचा आढावा घेतला.
प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक गोंधळून गेले आहेत. शहरातील ८१ प्रभागांतून १३०२ इतक्या व्यक्तिगत हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आघाडीने शहरात २२ हजार ६९६ मतदारांची नावे दुबार असल्याची तर १७ हजार ०६३ मतदारांची नावे ही एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे प्रशासनाची झोपच उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मतदार याद्यांतील दरुस्त्या करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. चारही विभागीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी या कामात गुंतल्याने महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.

क्षेत्रीय कार्यालये आज सुरू होणार
निवडणुकीच्या कामाचे विभाजन सात क्षेत्रीय कार्यालयांतून करण्यात आले आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे एक निवडणूक निर्णय अधिकारी व तीन साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून आज, गुरुवारपासून ही कार्यालये नियमितपणे सुरू होणार आहेत. या सर्व कार्यालयांत फर्निचरसह आवश्यक ते सर्व साहित्य आजच पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या चौदांपैकी पाच अधिकारी बुधवारी महापालिकेकडे हजर झाले. अन्य अधिकारीही दोन दिवसांत रूजू होतील, असे सांगण्यात आले.

७०० मतदार यंत्रांची मागणी
निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात साधारणपणे पाच मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यामुळे ८१ प्रभागांत सर्वसाधारण ४५० च्या आसपास मतदान केंद्रे राहतील, असे गृहीत धरून मनपा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे ७०० इलेक्ट्रिक मतदान मशीनची मागणी केली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून ही यंत्रे उपलब्ध होतील.

अंतिम मतदार यादी शनिवारी
मतदार याद्यातील दुरुस्त्या करण्याचे काम कोणत्याही परिस्थितीत बुधवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही धांदल उडाली होती. त्यांनी मतदार याद्या दुरूस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
आयुक्त पी. शिवशंकर यांनी चारही विभागीय कार्यालयांत जाऊन मतदार याद्या दुरुस्तीच्या कामाची माहिती घेतली. शनिवारी दिवसभरात अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

Web Title: Amendment of Voter Lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.