अमेरिकेतील अभियंता संतोष महाजन यांचे दातृत्व, महापालिकेला देणार ५० हजार शेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:48 PM2020-08-29T13:48:34+5:302020-08-29T13:50:41+5:30
सोशल मीडियावर शेणी दान बद्दल माहिती वाचून मूळचे कोल्हापूरचे पण सद्या नोकरीनिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये असणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय महाजन हे कोल्हापूर महानगरपालिकेला मदत म्हणून ५० हजार शेणी देणार आहेत.
कोल्हापूर- सोशल मीडियावर शेणी दान बद्दल माहिती वाचून मूळचे कोल्हापूरचे पण सद्या नोकरीनिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये असणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय महाजन हे कोल्हापूर महानगरपालिकेला मदत म्हणून ५० हजार शेणी देणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील सर्व स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शेणीचा तुटवडा जाणवत आहे. याबद्दल सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यम यातून शेणी दानबद्दल आवाहन करण्यात आले होते.
डॉ .डी. वाय.पाटील पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी याबद्दल आपल्या कॉलेजमधील मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर माहिती दिली होती. याला संतोष यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ५० हजार शेणी देत असल्याचे सांगितले.
संतोष यांनी १९९८ मध्ये कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील इंजिनीरिंग कॉलेज मधून बी.ई. कंप्युटर ही पदवी घेतली आहे. ते सद्या अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये पत्नी आदिती, मुले मोहित आणि अवधूत यांच्या सोबत राहतात.
वॉलमार्ट आयएनसी या बहुराष्ट्रीय कंपनीत ते सॉफ्टवेअर इंजिनीअर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तर त्यांची आई श्रीमती मंगल आणि भाऊ सुधीर हे कोल्हापूरात साळोखेनगर येथे राहतात. सामाजिक उपक्रमात सक्रिय असणाऱ्या संतोष यांनी सातासमुद्रापार राहून आपल्या शहराबद्दल दाखवलेली ही कृतज्ञता कोल्हापूरची माणुसकी आणि दातृत्व अधोरेखित करणारी आहे.
कोल्हापूरने भरभरून दिलं
माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरात झाले.मला कोल्हापूरने भरभरून दिले आहे.त्यामुळे कोल्हापूरबद्दल मनात कायम आपुलकी आणि प्रेम आहे. यातून ही छोटी मदत मी केली .
-संतोष महाजन.