अमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:16 PM2018-11-01T18:16:08+5:302018-11-01T18:19:18+5:30

यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे.

American military alarms, 168 hectares of crop damage in Kolhapur district | अमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पाने खाणाऱ्या लष्करी अळीमुळे मका पिकाची झालेली अवस्था.

Next
ठळक मुद्देअमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसानकरवीर, पन्हाळा, कागल तालुक्यांत जास्त प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोल्हापूर : यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अळीने नुकसान केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिपावसामुळे पिकांवरील कीड रोगांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. जास्त पाऊस आणि कमी सूर्यप्रकाशामुळे या अळ्यांचे प्रमाण वाढले. यात हुमणी, लोकरी मावा, तुडतुडे, गोगलगाय, सुरवंटासह पावसाळ्यातील किड्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात पाने खाणाऱ्या लष्करी अळीचाही समावेश होता. या वर्षी तर सलग पावसामुळे या अळीकडून होणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणात वाढच झाली.



आता या अळीमध्ये अमेरिकन लष्करी अळीची नव्याने भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील अतिपावसाच्या तालुक्यामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. विशेषत: कागल, करवीर, पन्हाळा या तीन तालुक्यांत या अळीने मका, ज्वारी, उसावर आक्रमण करून फडशा पाडल्याचे दिसत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणीही या अळीने पिकांचे नुकसान केले आहे.

ही अळी मुख्यत्वे मका पिकावर जास्त वाढते. पूर्ण पाने खाऊन ती बोंग्यातही शिरते. पाने कुरतडल्याने त्यांची जाळी तयार होउन पिकाची वाढ खुंटते. मका आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या या अळीने आता नव्याने लागण झालेल्या उसाकडे मोर्चा वळविला आहे. ही अळी उसाच्या पानांचा फडशा पाडत आहे. आडसाली, पूर्वहंगामी लागणीमध्ये याचा प्रादुर्भाव दिसत आहे. आधीच लोकरी मावा आणि हुमणीमुळे ऊसपीक अडचणीत असताना, आता या अळीच्या प्रसारामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

जिल्ह्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

करवीर (५५), कागल (५४), पन्हाळा (४०), गडहिंग्लज( १०), आजरा (०५), चंदगड (०४).

असे करा नियंत्रण

कृषी सहायकांच्या मदतीने तातडीने यावर उपाययोजना सुचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्याबरोबरच एकात्मिक किडी व्यवस्थापनसह क्लोरोअ‍ॅट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. अथवा नोमुरिया रिलेयी ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. तसेच या अळीचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून या अळीचे नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याविषयी कृषी विभागाकडून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.
 


या अळीच्या डोक्यावर उलटा ‘वाय’ आकाराचे चिन्ह दिसते आणि तिच्या शेवटच्या भागावर काळ्या रंगाचे चार ठिपके असतात. या वैशिष्ट्यावरून ही अळी ओळखता येते. या अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी १५ ते १६ दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते आणि सात ते आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. या किडीचा जीवनक्रम २५ ते ३० दिवसांत पूर्ण होतो. या पतंग आणि मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून सात ते आठ अळ्या तयार होतात. अशा प्रकारे या अळ्यांचा प्रसार वाढत जातो. त्यामुळे या धोकादायक अळीचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
पांडुरंग मोहिते,
कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर


 

 

Web Title: American military alarms, 168 hectares of crop damage in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.