‘आम्ही कोल्हापूरी’तर्फे कोविड सेंटरला २५ गाद्यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:24+5:302021-06-04T04:18:24+5:30
कोल्हापूर : आम्ही कोल्हापूरी या व्हाॅट्सअपचा ग्रुप च्यावतीने गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील डीओटी कोविड केअर सेंटरला कोविड रुग्णांसाठी आवश्यक ...
कोल्हापूर : आम्ही कोल्हापूरी या व्हाॅट्सअपचा ग्रुप च्यावतीने गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील डीओटी कोविड केअर सेंटरला कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या २५ गाद्या सेंटर प्रमुख डॉ. प्रकाश पावरा यांच्याकडे सुपूर्द करून आपली समाजाशी असणारी बांधिलकीची वीण घट्ट केली.
आम्ही कोल्हापुरी ग्रुपचे ऍडमिन नवेज मुल्ला, आशपाक आजरेकर यांनी नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी कोविड केअर सेंटरला भेट देऊन इथल्या कामकाजाबद्दल जाणून घेतले होते. यावेळी इथे रुग्णांना स्वतःचे अंथरूण घेऊन यावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याने या कोविड सेंटरला रुग्णांसाठी गाद्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आणि अवघ्या दोन दिवसांत सदस्यांनी १५ हजार रुपये जमा केले. गुरुवारी २५ गाद्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन सुपूर्द केल्या.
यावेळी नवेज मुल्ला, मिलिंद धोंड, आशपाक आजरेकर, प्राचार्य डॉ. महादेव नरके, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अन्य काही सदस्यसुद्धा उपस्थित होते.
आम्ही कोल्हापुरी व्हाॅट्सअॅप ग्रुप अापत्तीच्या काळात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत करणे शक्य आहे हे या ग्रुपने सोशल मीडियाची सुरुवात झाली त्याचवेळी दाखवून दिले होते.