अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह

By संदीप आडनाईक | Published: February 19, 2023 07:57 PM2023-02-19T19:57:45+5:302023-02-19T19:58:06+5:30

पत्नी सोनल शाह यांचे ज्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्या संस्थेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभात अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Amit Shah gave tips to students, new generation has the ability to make bright India: Amit Shah | अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह

अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आळस झटका, व्यायाम करा, जीवनाचे उच्च ध्येय गाठण्यासाठी छोटे छोटे संकल्प करा, एकवीस गुणिले नउ हा मंत्र बाळगा, केलेला संकल्प एकवीस वेळा पाळा, तो पुढे नउ वेळा वाढवा, त्याची चांगली सवय लागेल, रोज आईच्या पाया पडा, जेवण ताटात टाकू नका, वाहतूकीचे नियम पाळा, झोपताना घरातील लाईट बंद करा अशा छोट्या छोट्या टिप्स केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरात दिल्या.

पत्नी सोनल शाह यांचे ज्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्या संस्थेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभात अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सौ. स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयाला विशेष बाब  म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाची मान्यता जाहीर केली.

उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे आहे. भारताची शताब्दी होईल तेव्हा आजचीच पिढी रौप्यमहोत्सवात पदार्पण करेल. आपल्या जीवनाचे लक्ष्य निश्चित करा. आळस झटकून चांगल्या सवयी आत्मसात करा, असे आवाहन करुन नव्या पिढीच्या नशिबात महान भारताचा गौरव पहायला मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. भारतमाता की जय अशी घाेषणा देत व्यासपीठावर आलेल्या अमित शाह यांनी शौर्य, साहस, स्वराज्याची मशाल ज्यांनी पेटवली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करतो, अशी सुरुवात भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी जयघोष केला. शाह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजींचा जन्मदिन आणि गोपाळकृष्ण गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले. शाह पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या संकल्पातून जीवनाचे निश्चित ध्येय साध्य करुन मोठे ध्येय प्राप्त करावे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून मेहनतीने काम केल्यामुळेच ही संस्था शताब्दीपर्यंत पोहोचली. प्रत्येकाजवळ आपल्या शाळेच्या आठवणी असतात. गृहमंत्र्यांच्या पत्नी ज्या शाळेत शिकल्या, ती ही संस्थाही मोठीच आहे. सोनल शाह म्हणाल्या, या शाळेच्या प्रवेशद्वारातून येतानाच माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही चुका केल्या, शिक्षकांनी त्या सुधारल्या म्हणूनच ज्ञान घेता आले. भरपूर वाचा, खेळा आणि ज्ञान मिळवा. स्वागताध्यक्ष विनोदकुमार लाेहिया म्हणाले, संस्कारित शिक्षणासाठी समर्पित करण्यासाठी संस्था प्रयत्नशिल आहे. दोन वर्षापूर्वी या शाळेची पिन्सेस सोनल यांनी वडिलांच्या स्मृतिसाठी पाच लाख दिले, त्याचे विद्यार्थिनींना वितरण करण्यासाठी त्यांनी पुन्हा यावे.

या कार्यक्रमात शतसंवत्सरी या स्मरणिकेचे प्रकाशन अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, दीपक केसरकर, खासदार धनंजय मंडलिक आणि धनंजय माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिध्दी आवटे, काजल कोथळकर, कस्तुरी सावेकर, अनष्का पाटील आणि अशोक रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन वाडीकर, पद्माकर  सप्रे,  अनिल लोहिया, वसंत पाटील, नेमचंद संघवी, निर्मल लोहिया आदी उपस्थित होते.

सोनल शाह यांच्या वर्गमैत्रिणींची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी सोनल शाह यांच्या वर्गातील २२ वर्गमैत्रिणींनाही आवर्जुन निर्मत्रण देण्यात आले होते. त्या सर्वजणींना पुढच्या रांगेत बसवण्यात आले होते. याशिवाय दौलत भोसले हे सेवकही उपस्थित होते.

Web Title: Amit Shah gave tips to students, new generation has the ability to make bright India: Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.