बच्चन वेड्यांनी साजरा केला अमिताभ यांचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:13 AM2017-10-12T11:13:36+5:302017-10-12T11:14:20+5:30
‘अॅग्री यंग मॅन’ म्हणून जगभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस बुधवारी कोल्हापुरातील बच्चनवेड्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.
कोल्हापूर : ‘अॅग्री यंग मॅन’ म्हणून जगभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस बुधवारी कोल्हापुरातील बच्चनवेड्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. बच्चन यांचे गाजलेले डायलॉग, गाणी यांच्या सादरीकरणानेही रसिक मंत्रमुग्ध झाले.
महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शशी गजगेश्वर रिक्षावाला यांच्यासह बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपचे सर्व सदस्य शिवाजी चौकात आले. येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व ‘जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष करण्यात आला. ग्रुपमधील सदस्यांनी ‘हम जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती हैं...’ यासारखे गाजलेले डायलॉग ‘मैं हूँ डॉन...’ , ‘जहाँ तेरी ये नजर हैं..’ सारखी गाणी सादर केली.
बच्चनवेड्यांचा हा उत्साह पाहून या जल्लोषात तेथे उपस्थित नागरिकही सहभागी झाले. त्यानंतर इंडो बेकरीचे उमर मिरशिकारी यांनी आणलेला केक केक कापण्यात आला. जयेशभाई ओसवाल यांनी साखर वाटली. सुभाष गुंदेशा यांनी चहाची व्यवस्था केली.
यावेळी येत्या शनिवारी व रविवारी होणाºया बच्चन फिल्म फेस्टिव्हलच्या प्रवेशिकांची विक्री करण्यात आली. या प्रवेशिका बिंदू चौक ते शिवाजी चौक रोडवरील हेमंत स्पोर्टस् येथे उपलब्ध आहेत. या उपक्रमात सुधर्म वाझे, किरण पाटील, राजय नांद्रे, दीपक घार्गे, सचिन मणियार, वसीम जमादार, कुंदन जमादार, श्रीकांत घोडके, लक्ष्मण कांबळे, सूरज नाईक, सचिन गायकवाड, विश्वनाथ पोवार, विश्वनाथ कोरी, माधवी शहा, शुभदा कुलकर्णी, डॉ. गीता पिल्लई, डॉ. हर्षला वेदक, डॉ. शिवाजी जाधव, नीलम कक्कड, आनंद पराडकर, सरिता सुतार, रामदास रेवणकर, ‘आम्ही बच्चन ग्रुप’चे सुभाष घाटगे, रेवती देशपांडे, रतन भाकरे, ज्योती कुमठेकर, स्मिता माने, सुनीता शिंदे, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. दुसरीकडे ‘स्वरनिनाद’ व नितीन जाधव कल्चरल फौंडेशनतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात ‘बॉलिवूड शहेनशहा अमिताभ’ हा कार्यक्रम सादर झाला.
बच्चनवेड्यांनी घेतली अमिताभ यांची भेट
अॅडमिन सुधर्म वाझे यांच्या बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपच्या सदस्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. राजू बोरगांवे यांनी प्रयत्न करून सेटवर अमिताभ यांना भेटण्याची तारीख व वेळ मिळविली. तीन तास ‘कौन बनेगा करोडपती’चा कार्यक्रम व त्यानंतर प्रत्यक्ष बच्चन यांच्या अर्ध्या तासांच्या भेटीने सदस्य मंत्रमुग्ध झाले. यावेळी प्राचार्य किरण पाटील, सुधर्म वाझे, राजू बोरगांवे, प्रसाद जमदग्नी, प्रशांत शालगर, दीपक अष्टेकर, राजस नांद्रे, आनंद पराडकर, हर्षला वेदक, शिल्पा पुसाळकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.