अमोल काळेने केली मध्यप्रदेशातून पिस्तूल खरेदी : पानसरे हत्येप्रकरणी आणखी सात दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:24 PM2018-11-22T17:24:40+5:302018-11-22T17:28:49+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रथमदर्शनी संशयित अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ...
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रथमदर्शनी संशयित अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ३, अक्षय प्लाझा, माणिक कॉलनी, पिंपरी-चिंचवड, पुणे) याने मध्यप्रदेशातील सिंदवामधून पिस्तूल (अग्निशस्त्र) व राउंड खरेदी केल्याची व पानसरे हत्येपूर्वी बेळगाव येथून एक दुचाकी कोल्हापुरात आणून ठेवल्याची माहिती कोल्हापूर ‘एसआयटी’च्या तपासात पुढे आली आहे. याबाबतचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी कोल्हापुरातील न्यायालयात गुरुवारी केला.
गेल्या आठवड्यात बंगलोर येथील न्यायालयाच्या आदेशानंतर संशयित अमोल काळेचा ताबा कोल्हापूर ‘एसआयटी’ने बंगलोर ‘एसआयटी’कडून घेतला. त्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले. त्याला न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. तिची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे त्याला येथील १५ वे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून काळेला २९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.
यावेळी न्यायालयात विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी, अमोल काळेने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास यंत्रणेला विविध माहिती दिली आहे. तपासात प्रगती झाली आहे. त्यामुळे पुढील तपास करणे आवश्यक आहे. संशयित काळेने मध्यप्रदेशमधील सिंदवा या ठिकाणाहून पिस्तूल (अग्निशस्त्र) व राउंड खरेदी केली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे हे अग्निशस्त्र कशासाठी, कोणासाठी आणले व ते कुठे लपविले याची माहिती मिळवायची आहे.
याचबरोबर त्याच्याकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये सांकेतिक भाषेमध्ये काहींची नावे लिहिली आहेत. या नावांची खातरजमा करायची आहे. याचा तपास करावयाचा आहे. पानसरे हत्येच्या घटनेअगोदर या हत्येतील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या सांगण्यावरून बेळगावहून दुचाकी आणून कोल्हापुरात लावण्यात आली होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.