विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, कोल्हापुरातील अमोल पोवारला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:04 PM2024-11-19T13:04:33+5:302024-11-19T13:05:07+5:30
आजरा तालुक्यात झाला होता खून
कोल्हापूर : विम्याची रक्कम हडप करण्यासाठी मजुराचा खून करून स्वत:चा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करणारा बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (वय ४०, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला गडहिंग्लज न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी दोषी ठरविले. त्याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याचा भाऊ विनायक जयवंत पोवार (४४) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मार्च २०१६ मध्ये आजरा तालुक्यातील वेळवट्टीजवळ झालेल्या खून खटल्याचा निकाल सोमवारी लागला.
बांधकाम व्यावसायिक अमोल पोवार याच्यावर सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव केला. अपघात विम्याची ३५ कोटींची रक्कम हडप करता यावी यासाठी त्याने भाऊ विनायक पोवार याची मदत घेऊन मार्च २०१६ मध्ये गडहिंग्लज येथून मजूर रमेश कृष्णा नायक (वय १९, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज, मूळ रा. नागबेनाळ, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापूर, कर्नाटक) याला काम देण्याचे आमिष दाखवून कारमध्ये घेतले.
दारू पाजून त्याला आजऱ्याच्या दिशेने घेऊन गेले. कारमध्ये दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. अमोल पोवार यांची कपडे त्याला घातले. त्याचे घड्याळही मजुराच्या हातात घातले. त्यानंतर वेळवट्टी येथील लक्ष्मी ओढ्यात कार ढकलून डिझेल टाकून पेटवून दिली. स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव करून अमोल पोवार केरळमधील कोची येथे जाऊन लपला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन निरीक्षक दिनकर मोहिते आणि आजरा पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून दोन्ही आरोपींना अटक केली. सरकारी वकील एच. आर. एस. भोसले आणि सुनील तेली यांनी न्यायालयात ७१ साक्षीदार तपासले. यातील ३० जण फितूर झाले. साक्षीदारांच्या साक्षी, उपलब्ध पुरावे आणि वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश देशमुख यांनी आरोपी अमोल पोवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचा भाऊ विनायक पोवार याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
पोवारचा अनेकांना गंडा
अमोल पोवार याने बांधकाम व्यवसायातून अनेकांना गंडा घातला होता. यात काही खासगी सावकारांचाही समावेश होता. विमा कंपनीसही गंडा घालण्याचा कट त्याने रचला होता. ३५ कोटींची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी त्याने आधी एक कोटी रुपये भरून विमा उतरवला. त्यानंतर मजुराचा खून करून स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव केला.