पॅकेजची रक्कम ३० जूनपूर्वी
By admin | Published: June 7, 2015 01:25 AM2015-06-07T01:25:17+5:302015-06-07T01:25:17+5:30
चंद्रकांतदादांचे आश्वासन : बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बोलाविली तातडीची बैठक
कोल्हापूर : राज्यातील शेतकरी व साखर कारखान्यांची आर्थिक परवड पाहून त्यांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची आम्ही घोषणा केली आहे. हे पॅकेज देणारच आहोत; पण काही तांत्रिक अडचणी सोडविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १०) सर्व विभागांच्या सचिवांची तातडीची बैठक बोलाविली असून, यामध्ये पॅकेजचा निर्णय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपूर्वी पॅकेजची रक्कम कारखान्यांच्या खात्यांवर जमा होईल, असे आश्वासन सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाला दिले.
दोन हजार कोटींच्या पॅकेजबाबत राष्ट्रवादीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाबरोबर मंत्री पाटील यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, एफआरपीप्रमाणे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. केवळ कोल्हापुरातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिल्याने तुम्हाला अभिमान वाटायला हवा. दादा, तुमच्या शब्दाला वजन आहे. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष कोल्हापुरात येतात. त्यामुळे तुम्ही पॅकेजचा शब्द टाकला की, तो केंद्राने झेलला पाहिजे. तुम्ही आडनावाने पाटील आहात, दणका द्या. ‘आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात’, याचे भान ठेवा, असा टोला हाणत, तुम्ही विरोधात असताना आंदोलन करत होता आम्ही कधीही त्याला विरोध केला नाही. दादा, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. घोषणा केल्याप्रमाणे कारखान्यांना विनाअट पैसे देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
यावर बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पॅकेज देण्यास विलंब झाला, हे मान्य आहे. तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी बुधवारी (दि. १०) वित्त, सहकार, कृषी यांसह सर्व सचिवांना मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे. पैसे थेट ट्रेझरीमधून उभे करायचे, खुल्या बाजारातून घ्यायचे, की कारखान्यांच्या कर्जाला शासकीय हमी द्यायची, अशा विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. राज्याने बफर स्टॉक केला, तर उत्तर प्रदेशची साखर मोठ्या प्रमाणात बाजारात येईल. परिणामी, दर पुन्हा घसरतील. यासाठी केंद्रानेच बफर स्टॉक करणे गरजेचे आहे.
पवारसाहेबांचा मात्रा चाललाच नाही
साखर कारखानदारीला मदत मिळावी, यासाठी आठवेळा केंद्राच्या पातळीवर प्रयत्न केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पॅकेजमधील काही रक्कम केंद्राकडून मिळेल, असे वाटत होते; पण पवार साहेबांचाही मात्रा चालला नसल्याचा चिमटा मंत्री पाटील यांनी काढला.
प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीची धडपड
कोल्हापुरात आंदोलनाची नवीन पद्धत, ट्रेंड पडेल त्याचबरोबर कॉलनीत सामान्य माणसे राहतात, त्यांना नाहक त्रास होईल यासाठीच मोर्चाला विरोध केला. तरीही राष्ट्रवादीने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नवीन केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, असा टोला हाणत नवीन असल्याने विरोधी पक्षाची भूमिका अजून तुम्हाला समजलेली नाही; पण जरा अंदाज घेऊन आंदोलने करा, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला.
‘एफआरपी’ दिली नाही तर कारवाईच
विनाअट पॅकेज देणार नाही. राज्यातील ऊस उत्पादकांचे ३८०० कोटी देणे आहे, त्यातील आम्ही दोन हजार कोटी देत आहोत. उर्वरित १८०० कोटी कारखाने कसे देणार, याविषयी हमी मागणारच. पॅकेज देऊनही एफआरपीप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत, तर त्या कारखान्यांवर कारवाई करणारच, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.