अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जातेच कशी?, केंद्र सरकारचा कारवाईचा बडगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 11:56 AM2022-01-11T11:56:11+5:302022-01-11T11:56:46+5:30

केंद्र सरकारने २०१९ पासून ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत.

The amount of pension on the account of ineligible farmers in P. M Kisan pension scheme | अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जातेच कशी?, केंद्र सरकारचा कारवाईचा बडगा 

अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जातेच कशी?, केंद्र सरकारचा कारवाईचा बडगा 

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ पेन्शन योजनेतील अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा पेन्शनची रक्कम जातेच कशी? त्यांच्याकडून वसुली करून पुन्हा ही रक्कम जमा झाल्यास जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय वित्त व कृषी मंत्रालयाने राज्यांना काढले आहेत.

केंद्र सरकारने २०१९ पासून ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार ४७६ शेतकऱ्यांना योजना सुरू झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. यामध्ये ज्यांच्या नावावर जमीन नाही, जे योजनेच्या निकषात बसत नाहीत, असे लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने सर्वच खात्यांची तपासणी केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार शेतकरी अपात्र ठरले होते.

अपात्र शेतकऱ्यांचा आकडा पाहून केंद्र सरकारने संबंधित शेतकऱ्यांकडून पैसे वसुली करून घेण्याचे आदेश संबंधित राज्यांना दिले होते. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून वसुलीची माेहीम राबवली. संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा काढून विहित वेळेत लाभ घेतलेली रक्कम शासनाला परत करण्याचे आदेश नोटिसीव्दारे दिले होते.

त्यानुसार जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी पैसे परत केले होते. वास्तविक १६ हजार शेतकऱ्यांकडून पेन्शनची रक्कम परत घेत असतानाच तेथून पुढचे हप्ते बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारचे होते. मात्र अपात्र ठरलेल्या ८ हजार ६०० शेतकऱ्यांना पुन्हा पेन्शन येत आहे.

सहा महिन्यांपूर्वी आदेश देऊनही अपात्र शेतकऱ्यांची पेन्शन बंद होत कशी नाही? अशी विचारणा केंद्रीय अर्थ व कृषी मंत्रालयाने राज्य शासनाकडे केली आहे. राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, विभागीय आयुक्तांना वसुलीसह पेन्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यातील ३२०० जणांची पेन्शन बंद

जिल्ह्यातील १६ हजार अपात्र पेन्शनधारकांपैकी आतापर्यंत केवळ ३२०० जणांची पेन्शन बंद झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

१.९४ लाख शेतकऱ्यांना नववा हप्ता

केंद्र सरकारने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८ कोटी रुपयांचा नववा हप्ता जमा केला.

Web Title: The amount of pension on the account of ineligible farmers in P. M Kisan pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.