पूरग्रस्तांना दिलेली सवलतीची रक्कम पुन्हा थकबाकीत,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:58+5:302021-07-21T04:16:58+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०१९ मधील महापुरामुळे फटका बसला होता, त्यावेळी ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले, अशा मिळकतधारकांना महापालिकेने घरफाळ्यात ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०१९ मधील महापुरामुळे फटका बसला होता, त्यावेळी ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले, अशा मिळकतधारकांना महापालिकेने घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत दिली. सवलतीनुसार अनेकांनी घरफाळा भरला खरा, पण संगणकीय प्रणालीमध्ये योग्य वेळी बदल केले गेले नसल्यामुळे सवलतीची पन्नास टक्के रक्कम चालूवर्षीच्या घरफाळ्यात थकबाकी म्हणून आल्याने पूरग्रस्त चक्रावून गेले आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने पूरग्रस्त मिळकतधारकांना त्यांच्या वार्षिक घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात करण्याचे ठरले. तसा ठराव झाला. परंतु घरफाळा विभागाकडून योग्य वेळेत ठरावाची माहिती लिखित स्वरूपात गेली नाही. त्यामुळे पूरग्रस्त अस्वस्थ बनले. पालिका अधिकाऱ्यांकडे विचारपूस होताच, तात्पुरता पर्याय म्हणून एक मार्ग काढण्यात आला. ज्यांच्याकडे पंचनाम्याचे दाखले आहेत, त्यांनी ते दाखवावेत असे सांगण्यात आले. त्यानुसार दाखला दाखवून सुमारे ८०० हून अधिक मिळकत धारकांपैकी कोणी पन्नास टक्के, तर कोणी शंभर टक्के घरफाळा भरला.
यावर्षीच्या एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू झाले. यावेळी तरी घरफाळा विभागाकडून संगणक विभागाला माहिती दिली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु कोणतीच माहिती दिली गेली नाही. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये काहीच बदल झाले नाहीत. जेव्हा नागरिक घरफाळा भरायला गेले, तेव्हा त्यांच्या बिलात गतवर्षीची पन्नास टक्के रक्कम थकबाकी म्हणून दाखविली गेल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार घरफाळा भरून देखील थकबाकी कशी आली, याची चौकशी केली, तर त्यांना मागच्या सवलतीची रक्कम थकबाकीत दाखविली गेल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी अनेक मिळकतधारक सहा टक्क्यांची सवलत घेण्यास पुढे येत आहेत. त्यामध्ये पूरग्रस्तांचाही समावेश आहे. मागची सवलतीची थकबाकी कमी केल्याशिवाय त्यांना यंदाची बिले भरता येत नाहीत, शिवाय प्रशासनाकडून ही थकबाकी कमी करण्यास विलंब होत असल्याने सहा टक्क्यांची सवलत मिळणे आता दुरापास्त होण्याची शक्यता आहे. वास्तविक प्रामाणिक मिळकत धारकांना असे ताटकळत ठेवणे अपेक्षित नाही. परंतु प्रशासनही गतीने हलताना दिसत नाही.
दोन-चार दिवसात बदल होतील
घरफाळा विभागाकडे माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार केल्या जात आहेत. बिलांमधील बदल दोन-चार दिवसात होईल. त्यानंतर पूरग्रस्तांना दुरुस्त केलेला घरफाळा भरता येणार आहे.
- यशपालसिंग रजपूत, सिस्टिम मॅनेजर.