प्राध्यापक भरतीसाठी ‘एम्फुक्टो’चा लढा ‘-- शिक्षक दिना’च्या पूर्वसंध्येला मुंबईत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 11:15 PM2018-09-02T23:15:51+5:302018-09-02T23:17:07+5:30
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती
संतोष मिठारी।
कोल्हापूर : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (एम्फुक्टो) आंदोलनाद्वारे लढा सुरू केला आहे. त्याअंतर्गत शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील प्राध्यापक मंगळवारी (दि. ४) मुंबईत स्वत:ला अटक करून घेऊन काळा दिवस पाळणार आहेत.
उच्च शिक्षण विभागाच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार शैक्षणिक वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशींप्रमाणे आवश्यक असलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाण १:२० असणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात याउलट स्थिती आहे. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे प्राध्यापकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाद्वारे लढा उभारण्याचा ठराव ‘एम्फुक्टो’च्या सर्वसाधारण परिषदेच्या सभेत दि. १७ जून रोजी मुंबईत घेण्यात आला. त्यानुसार ‘एम्फुक्टो’द्वारे राज्यातील प्राध्यापकांना या ठरावाची माहिती, जिल्हास्तरीय सभा आणि सह्यांची मोहीम राबविण्यात आली. प्रत्यक्षात आंदोलनाची सुरुवात दि. ६ आॅगस्टला ‘मागणी दिन’ पाळून करण्यात आली. त्यानंतर विभागीय शिक्षण सहसंचालक आणि पुणे येथील शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. लढ्याची तीव्रता वाढविण्यासाठी उद्या, मंगळवारी राज्यभरातील प्राध्यापक स्वत:ला अटक करवून काळा दिवस पाळणार आहेत.
सरकारचे दुर्लक्ष
‘एम्फुक्टो’च्या शिष्टमंडळाने राज्यातील प्राध्यापकांच्या सह्यांचे निवेदन कुलपती यांना दिले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यभर प्राध्यापकांचे आंदोलन सुरू आहे. त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष
आहे.
आंदोलनाचे पुढील टप्पे
५ सप्टेंबर : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवेळी निदर्शने
११ सप्टेंबर : एकदिवसीय काम बंद आंदोलन
१५ सप्टेंबरपासून : कॅबिनेट मंत्री यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवेळी निदर्शने
२५ सप्टेंबर : बेमुदत काम बंद आंदोलन.
प्रलंबित मागण्या
राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित कायमस्वरूपी भराव्यात.
राज्यातील प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन त्वरित अदा करावे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी त्वरित करावी.
जुनी पेन्शन योजना लागू करावी.