अमृत योजनेचा ठेका काढून घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:07 AM2019-06-18T01:07:13+5:302019-06-18T01:09:21+5:30

शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच

 Amrit Scheme Removal Guidelines | अमृत योजनेचा ठेका काढून घेण्याचा इशारा

महानगरपालिकेत सोमवारी झालेल्या बैठकीत अमृत योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाºयास नगरसेवक राहुल चव्हाण यांनी काम वेळेत न केल्यास शहरातून धिंड काढण्याचा इशारा दिला.

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या सुरू असलेली कामे जर पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाहीत तर ठेक्याबाबत विचार करावा लागेल, अशा शब्दांत ठेकेदारास इशारा देण्यात आला.

कोल्हापूर : शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच कानउघाडणी केली. सध्या सुरू असलेली कामे जर पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाहीत तर ठेक्याबाबत विचार करावा लागेल, अशा शब्दांत ठेकेदारास इशारा देण्यात आला.

राज्य सरकारच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या ११५ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या कामावर कन्सल्टंट म्हणून महाराष्ट जीवन प्राधिकरणाची नेमणूक केली आहे. महापालिका प्रशासनाकडे त्याची कसलीच सूत्रे ठेवलेली नाहीत. त्यामुळे या कामावरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. गेले वर्षभर हे काम रखडले आहे. त्यामुळे नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी यासंबंधी आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिका तसेच जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. मात्र, मुख्य ठेकेदार उपस्थित नव्हता. त्यांचे किरण पाटील नावाचे एक सुपरवायझर उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवकांच्या संतापाचा पारा आणखी चढला.

अनेक नगरसेवकांनी या सुपरवायझरला अक्षरश: फैलावर घेऊन प्रश्नांचा भडिमार केला.
गेले वर्षभर काम रखडले आहे. तुमच्याकडे यंत्रणा नाही तर मग जलवाहिनी टाकण्याकरिता उकरले तरी कशाला, असा सवाल सभापती देशमुख यांनी विचारला. पावसाळा जवळ आला असल्याने लोक आम्हाला जाब विचारत आहेत. जेथे खुदाई केली आहे तेथील जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करा, त्यावर डांबरी पॅचवर्क करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जोपर्यंत जुनी कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्य ठिकाणी नवीन काम हाती घेऊ नका, अशी सूचनाही देशमुख यांनी केली.

जलवाहिनी टाकण्यापूर्वी केलेले सर्वेक्षण चुकीचे झाले आहे. अनावश्यक ठिकाणी जलवाहिनी टाकल्या जात आहेत. टाकलेल्या जलवाहिनीला कनेक्शन जोडण्याचे काम केले जात नाही, असे उमा बनछोडे यांनी निदर्शनास आणून दिले. ठेकेदाराने ११५ कोटींचे काम घेतले आहे, पण दोन कोटी रुपये त्यांच्याकडे नाहीत. त्यांना जर काम जमणार नसेल तर पूर्ण कामच थांबविण्याचे आदेश द्या, अशी सूचना विलास वास्कर यांनी केली.

चक्क धिंड काढण्याचा इशारा
राहुल चव्हाण यांनी ठेकेदाराच्या सुपरवायझरला फैलावर घेताना जर काम वेळेत आणि समाधानकारक झाले नाही, तर शहरातून धिंड काढावी लागेल, अशा संतप्त शब्दांत इशारा दिला. या लोकांना कामाचे गांभीर्य नाही. कोल्हापुरी हिसका दाखवायलाच पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. तर ठेकेदाराला दंड आकारला पाहिजे. जोपर्यंत दंड बसणार नाहीत तोपर्यंत वळणावर येणार नाही, असे शारंगधर देशमुख म्हणाले.

 

Web Title:  Amrit Scheme Removal Guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.