अमृत योजना होऊ देणार नाही : कुरुंदवाडला सर्वपक्षीय बैठकीत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:29 AM2018-05-23T00:29:41+5:302018-05-23T00:29:41+5:30
कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही.संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे
कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही. संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीची अमृत योजना होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही बळी द्यावे लागले तरी चालेल, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी दिला.
येथील कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर आमदार उल्हास पाटील यांनी वारणा बचाव व नदी प्रदूषण हटाव मोहीमेसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत धनवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उल्हास पाटील होते. तर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. नीता माने, कुरुंदवाड नगराध्यक्ष जयराम पाटील, जि. प. सदस्य विजय भोजे प्रमुख उपस्थित होते. वारणाप्रश्नी ठोस निर्णय घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.
धनवडे म्हणाले, शहराला दोन नद्यांच्या योजना असताना वारणेची योजना कशाला पाहिजे, मागणी नसतानाही विकासाच्या नावाखाली ही योजना मंजूर करण्यामागे गौडबंगाल काय? या योजनेने पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असेल तर विकास होऊन काय करावयाचे.
आमदार पाटील म्हणाले, वारणेतून आठ टीएमसी पाणी कृष्णेत येते; हेच पाणी इचलकरंजीला मिळत असल्याने वारणेच्या योजनेची गरजच काय? या नव्या योजनेवर खर्च करण्यापेक्षा तोच निधी पंचगंगा नदी प्रदूषणावर खर्च केल्यास पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. पाणी कमी पडत असेल तर कृष्णेतून आणखी एक योजना करा, मात्र वारणेतून एक थेंबही पाणी मिळणार नाही, असे सांगत आमदार पाटील यांनी हाळवणकरांनी जिल्ह्याचा इतिहास मला शिकवू नये. प्रथम त्यांनी भूगोलाचा अभ्यास करावा, असा टोला देत दडपशाही केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी वारणा बचाव व नदी प्रदूषणमुक्तीसाठी शिरोळ तालुक्याबरोबर असल्याचे सांगितले. यावेळी अमृत योजना रद्द होईपर्यंत व पंचगंगा-कृष्णा नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जि. प. सदस्य विजय भोजे, प्रसाद धर्माधिकारी, कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, अमरसिंह पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांची भाषणे झाली. बैठकीस पं. स. सभापती मीनाक्षी कुरडे, बाबासो सावगावे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण, सुरेश कांबळे, आप्पासो चौगुले, दीपक कोळी, धनाजी चुडमुंगे, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी आभार मानले.
कुरुंदवाड येथे कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर सर्वपक्षीय बैठकीत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे भाषण झाले. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, महादेव धनवडे, आमदार उल्हास पाटील, दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.