‘अमृत योजने’ला वारणाकाठचा विरोधच

By admin | Published: June 25, 2016 12:11 AM2016-06-25T00:11:47+5:302016-06-25T00:45:41+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन : लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे म्हणणे ऐकण्याची गरज

The 'Amrut Yojana' is opposed to Varanak | ‘अमृत योजने’ला वारणाकाठचा विरोधच

‘अमृत योजने’ला वारणाकाठचा विरोधच

Next

भालचंद्र नांद्रेकर -- दानोळी शिरोळ तालुक्याच्या उत्तर भागाला व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांना, तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना मुख्य जलवाहिनी म्हणून वारणा नदीची ओळख आहे़ दानोळी (ता़ शिरोळ) येथील वारणा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे़ मात्र, अमृत योजनेच्या विरोधासाठी दोनवेळा गावे बंद करून शासनाचा निषेध नोंदवला आहे़ अशा परिस्थितीत या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली असली तरी वारणाकाठावरील नागरिकांना विश्वासात घेऊन बैठक आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे़
गेल्या चार महिन्यांपूर्वी दानोळी येथे अमृत योजनेच्या विरोधात वारणा बचाव कृती समितीची स्थापना केली आहे़ यावेळी प्रथम दानोळी गाव बंद ठेवून शासनाचा निषेध केला होता़ तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील व सांगली जिल्ह्यातील गावे एकजुटीने बंद ठेवून दुसऱ्यांदा शासनाला जाग आणली होती़ यातून कोणताही तोडगा यावर निघाला नसताना अमृत योजनेला मान्यता मिळाली आहे़
वारणाकाठावरील शेतकरी व नव्याने समाविष्ट झालेले धरणग्रस्त शेतकरी वारणेच्या पाण्यावर आपले जीवन जगत आहेत़ यामुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम मिटविणे ही कायदेशीर जबाबदारी आहे़ येथील शेतकरी व धरणग्रस्तांशिवाय इतर कोणालाही वारणेचे पाणी दिले जाणार नाही, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ़ भारत पाटणकर यांनी व्यक्त केले होते़ इचलकरंजीला ७१ कोटींची अमृत योजना मंजूर झाली आहे़ तरी याला वारणा काठावरून विरोध होत आहे़ सध्या इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी असून, या नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे़ बस्तवाड येथून कृष्णा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होतो़ त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नागरिकांना विश्वासात घेऊन योजना पूर्ववत करण्याची गरज आहे़

आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीच्या अमृत योजनेला अंतिम टप्प्यातील मंजुरी आणली असली तरी ही योजना वारणाकाठावरील नागरिक मिळून हाणून पाडू. तसेच येत्या आठवड्याभरात वारणा काठावरील सर्व गावांतून अमृत योजनेच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना ठराव देणार असून, या योजनेला आमचा कायम विरोध राहणार आहे़
- महादेव धनवडे,
वारणा बचाव कृती समिती कार्यकर्ते.

Web Title: The 'Amrut Yojana' is opposed to Varanak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.