‘अमूल’ची तीन हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Published: July 29, 2016 12:53 AM2016-07-29T00:53:53+5:302016-07-29T00:53:53+5:30

‘गोकुळ’समोरील अडचणी वाढणार : मार्केटिंग पॉलिसीसह संचालकांच्या सवयी बदलण्याची गरज

'Amul' invested Rs 3,000 crore | ‘अमूल’ची तीन हजार कोटींची गुंतवणूक

‘अमूल’ची तीन हजार कोटींची गुंतवणूक

Next

राजाराम लोंढे -- कोल्हापूर -अमूल दूध संघाने विदर्भ, मराठवाड्यासह कोल्हापुरात पाय पसरण्यास सुरुवात केली असून राज्यात तीन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी केल्याने ‘गोकुळ’समोर नवीन आव्हाने तयार झाली आहेत. ‘अमूल’चा पूर्वानुभव पाहता त्यांनी ‘महानंदा’सारख्या बलाढ्य संघाला घाईला आणले तिथे इतर संघांची अवस्था बिकट होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी ‘गोकुळ’ने आपल्या पारंपरिक सवयी बदलून नवीन मार्केटिंगचे तंत्र आत्मसात केले तरच या स्पर्धेत टिकू शकणार आहे.
राज्यातील सर्व दूध संस्थांची शिखरसंस्था म्हणून महानंदा दूध संघाकडे पाहिले जाते. प्रतिदिनी बारा लाख लिटर संकलन आणि तितकेच वितरण असलेल्या संघाच्या स्पर्धेत ‘अमूल’ उतरला. ‘अमूल’ने ‘महानंदा’पेक्षा जास्त दराने दूध खरेदी सुरू केल्याने बघता-बघता ‘महानंदा’चे संकलन दोन लाखांपर्यंत खाली आले. तोटा ४०-५० कोटीपर्यंत आल्याने संघ डबघाईला आला. आता ‘अमूल’ने संपूर्ण महाराष्ट्रात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरातही त्यांनी महालक्ष्मी दूध संघाच्या माध्यमातून एंट्री केल्याने ‘गोकुळ’ ची डोकेदुखी वाढणार आहे. ‘गोकुळ’चा डोलारा म्हैस दुधावरच अवलंबून आहे, ‘अमूल’ने यावरच घाव घातला तर हा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही.


‘अमूल’ला रोखण्यासाठी सरकारला साकडे!
जिथे दूध संघ सक्षमपणे काम करीत नाहीत, अशा विदर्भ, मराठवाडा, कोकणात ‘अमूल’ला संकलन करण्यास परवानगी द्यावी. कोल्हापूर जिल्ह्यातील संघ सक्षम असल्याने येथे ‘अमूल’ने प्रयत्न करू नयेत. यासाठी तत्कालीन दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्यामार्फत ‘गोकुळ’चे प्रयत्न सुरू होते तरीही ‘अमूल’ने कोल्हापुरातील तयारी सुरूच ठेवल्याने पुन्हा सरकारकडे साकडे घालण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.


उत्पादकांबरोबर विरोधकांचेही प्रबोधन गरजेचे
‘अमूल’ची एंट्रीच दमदार असते, प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त दर देऊन उत्पादकांना आकर्षित केले जाते. त्याचबरोबर मार्केटिंग पॉलिसी जबरदस्त असल्याने तिथेही ते ऐकणार नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांबरोबरच विरोधकांच्या संस्था ‘अमूल’च्या हाताला लागू नयेत, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.


‘अमूल’च्या ब्रँडची किंमत ३२ हजार कोटी
‘अमूल’ने मार्केटिंग पॉलिसीच्या माध्यमातून देशासह अांतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दूध व उपपदार्थांच्या गुणवत्तेमुळे ‘अमूल’या ब्रँडची किंमत ३२ हजार कोटी आहे. इतक्या ताकदीच्या संघाशी ‘गोकुळ’ला स्पर्धा करावी लागणार आहे.

Web Title: 'Amul' invested Rs 3,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.