आराखडे, सादरीकरण झाले पण उड्डाणपूल हवेतच राहिले, कोल्हापुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे-थे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:16 PM2022-02-17T12:16:05+5:302022-02-17T12:16:30+5:30
शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण
भारत चव्हाण
कोल्हापूर : वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सन २०१७ मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या गर्दीच्या भागात पाच उड्डाणपूल उभारण्याचे आराखडे तयार केले, परंतु गेल्या पाच वर्षांत या आराखड्यावर कसलीच चर्चा झाली नाही. ज्यांच्या सूचनेवरून उड्डाणपुलाचे आराखडे झाले, त्या चंद्रकांत पाटील यांच्याकडून नंतर दुर्लक्ष झाले. महाविकास आघाडीचेही दुर्लक्ष झाले. त्यामुळे उड्डाणपूल हवेतच राहिले.
कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, खासगीकरणातून विकासकामे करण्यास होणार विरोध लक्षात घेऊन, युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी पाच उड्डाणपूल उभारण्यासाठी आर्किटेक्ट संदीप गुरव यांना आराखडे बनविण्यास सांगितले होते. त्यांनी दिवसरात्र काम करून ते आराखडे तयार केले. त्याचे एकदा सादरीकरण झाले, पण नंतर सर्व आराखडे कपाटबंद राहिले आणि उड्डाणपूल हवेतच विरले.
शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण प्रचंड आहे. शहराभोवतीचा रिंग रोडही झालेले नाही. त्यामुळे पुणे, सोलापूर, सांगली, तसेच उत्तर कर्नाटकातून येणारी सर्व वाहने कोल्हापूर शहरातूनच खाली कोकणात जातात. त्याचा परिणाम म्हणून शहरात कोणत्याही भागात गेलात, तरी लहान रस्ते, वाढलेली अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी, पार्किंग यांसारखे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत.
भविष्यकाळाचा विचार करता, पुढील काही वर्षांत आणखी वाहनांची संख्या वाढून वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे. म्हणूनच आहे त्याच रस्त्यांचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यायचा असेल, तर उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणताही विकास करण्याआधी वाहतुकीच्या समस्येला सर्वाधिक प्राधान्य देण्यावर विचार आणि निधीची तरतूद करावी लागणार आहे.
पाचही उड्डाणपूल एकदम होणार नसले, तरी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी एखादा तरी उड्डाणपूल, रिंग रोड करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील असोत की, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असोत, दोघेही निधी आणण्यात तरबेज आहेत, पण त्यांनी एकदा या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
असे होते उड्डाणपुलाचे आराखडे
- दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक - लांबी १५०, रुंदी ८ मीटर
- दाभोळकर चौक ते दसरा चौक - लांबी - लांबी २०००, रुंदी ८ मीटर
- जोतिबा हॉटेल ते कावळा नाका चौक - लांबी २०००, रुंदी आठ मीटर
- टाउन हॉल ते जयंती नाला - लांबी ८००, रुंदी, ८ मीटर
- पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर - लांबी २,००० मीटर, रुंदी आठ मीटर