पिसाळलेल्या कुत्र्याने बालकाच्या कानाचा लचकाच तोडला, कोल्हापुरातील पोर्ले तर्फ ठाणे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:37 PM2022-12-07T18:37:00+5:302022-12-07T18:37:27+5:30
गावात पसरले भितीचे वातावरण
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : पिसाळलेल्या कुत्र्याने पाच वर्षाच्या बालकाच्या कानाचा लचका तोडल्याची घटना घडली. शिवराज सरदार देवकुळे असे बालकाचे नाव आहे. जखमी बालकावर कोल्हापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील आणखी तिघांना चावा घेतला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसापासून पिसाळलेल्या कुत्र्याने गावात धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याने गावातील अनेक नागरिकांचा चावा घेतला आहे. आज, बुधवारी बुचडे गल्लीत शिवराज खेळत असताना त्याच्या अंगावर धावून जात कानाचा लचका तोडला. त्यानंतर कुत्रे पळून गेले. शिवराजचा कान पाहून नातेवाईकांची भांबेरी उडाली.
पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी गेले दोन दिवस तरूणांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतू ते माजगावच्या दिशेने पळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कुत्र्याच्या या हल्ल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.