Kolhapur: निनावी फोन आला अन् वसतिगृहातून गायब सात मुलं जंगलात सापडली, विद्यार्थी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:37 PM2024-01-18T12:37:32+5:302024-01-18T12:37:53+5:30

गडहिंग्लज : नवोदयसह निरनिराळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वसतिगृहात प्रवेश घेतलेले सात अल्पवयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी अचानक वसतिगृहातून गायब झाले. दरम्यान, ...

An anonymous call came and seven boys missing from the hostel were found in the forest in kolhapur | Kolhapur: निनावी फोन आला अन् वसतिगृहातून गायब सात मुलं जंगलात सापडली, विद्यार्थी म्हणाले...

Kolhapur: निनावी फोन आला अन् वसतिगृहातून गायब सात मुलं जंगलात सापडली, विद्यार्थी म्हणाले...

गडहिंग्लज : नवोदयसह निरनिराळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वसतिगृहात प्रवेश घेतलेले सात अल्पवयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी अचानक वसतिगृहातून गायब झाले. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने राबवलेल्या तीन तासांच्या शोधमोहिमेमुळे ते सर्व विद्यार्थी तळेवाडी हद्दीतील जंगलात सुखरूप आढळले. त्यामुळे क्लासचालक, पालकांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

हकीकत अशी, नेसरी-चंदगड रोडवरील एका खासगी क्लासेसमध्ये ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची नवोदय, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, सैनिक स्कूल प्रवेश आदी परीक्षांची तयारी करून घेतली जाते. त्याठिकाणी ८० मुला-मुलींनी प्रवेश घेतला असून त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोयदेखील केली आहे.

बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘त्या’ क्लासमधून ७ विद्यार्थी अचानक बाहेर पडले. वसतिगृहासह परिसरात शोधाशोध करूनही ते न सापडल्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या क्लासचालकांनी नेसरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नेसरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक रोहित दिवसे यांनी तातडीने यासंदर्भातील संदेश ‘व्हॉटस्ॲप’वरून परिसरातील विविध गावातील ग्रुपवर पाठवला. त्या मुलांच्या शोधासाठी खास पथक तयार करून त्यांनी नेसरी परिसरात शोधमोहीम राबवली. त्यामुळे ते सर्व विद्यार्थी सुखरूप मिळून आले. त्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या शोधमोहिमेत सपोनि दिवसे यांच्यासह सहायक फौजदार पांडुरंग गुरव, सहायक फौजदार राजू पताडे, पोलिस नाईक नामदेव कोळी यांनी भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.

एका निनावी फोनमुळे..!

पोलिसांची शोधमोहीम सुरू असतानाच एका अज्ञाताने काही शाळकरी मुले नेसरी-चंदगड मार्गावरून शेतवडीतील पायवाटेने अडकूरच्या दिशेने चालत जात असल्याची माहिती दिवसे यांना दिली. त्यावरून पथकासह त्यांनी अडकूरकडे धाव घेतली. दरम्यान, तळेवाडी गावच्या हद्दीतील जंगलात काही मुलं लपून बसल्याचे आढळून आले. चौकशीअंती ती मुले ‘त्या’ क्लासमधील असल्याचे निष्पन्न झाले.

वसतिगृहातील गैरसोयीमुळे ?

मुला-मुलींच्या वसतिगृहात पुरेसे शौचालय नसून अनेक गैरसोयी असल्यामुळे घरी जाण्यासाठी आम्ही क्लासमधून बाहेर पडलो होतो, असे ‘त्या’ मुलांनी पोलिसांना सांगितले असून, ते सर्वजण चंदगड तालुक्यातील असल्याची चर्चा आहे.


खाजगी वसतिगृहात मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सोयी-सुविधा आणि सुरक्षितता आहे की नाही याची खात्री करूनच मुलांना वसतिगृहात ठेवावे. मुलांच्या भविष्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी. - रोहित दिवसे, पोलिस उपनिरीक्षक, गडहिंग्लज

Web Title: An anonymous call came and seven boys missing from the hostel were found in the forest in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.