कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन, अन् उडाली एकच तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:44 PM2022-11-28T13:44:15+5:302022-11-28T14:03:35+5:30
अंबाबाई मंदिरातील संशयास्पद वस्तूचा शोध घेण्यासाठी तातडीने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. भाऊसिंगजी रोडवरून येणाऱ्या श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकली.
कोल्हापूर : रविवारी (दि. २७) संध्याकाळी साडेपाचची वेळ... श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची तोबा गर्दी... जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील फोन खणखणला आणि पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांनी अंबाबाई मंदिरात धाव घेतली. काही क्षणांत सर्व जिथल्या तिथे स्तब्ध झाले. पोलिसांनी संशयित वस्तूचा शोध घेतला अन् अखेर हे मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी दिवसेेंदिवस वाढत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणा अंबाबाई मंदिरात तैनात असतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरातील चारीही प्रवेशद्वारांमधून भाविकांची वर्दळ सुरू होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुना राजवाडा पोलिस ठाण्यात लँडलाईनवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवला असल्याचे त्याने सांगितले अन् पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली.
काही क्षणांत श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक अंबाबाई मंदिरात दाखल झाले. स्पेशल फोर्सच्या जवानांसह पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मंदिरातील भाविकांना बाहेर काढून सर्व प्रवेशद्वारे बंद केली. त्यानंतर संशयित वस्तूंचा शोध सुरू झाला. सुमारे अर्ध्या तासात संपूर्ण मंदिराची तपासणी केली; परंतु कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर हे मॉक ड्रिल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
मॉक ड्रिल संपताच पुन्हा भाविकांच्या दर्शनरांगा सुरू झाल्या. मॉक ड्रिलमुळे सुमारे अर्धा तास भाविकांना ताटकळत थांबावे लागले. मात्र मंदिरातील सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे समजताच त्यांनीही सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले.
श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकली
श्री अंबाबाई मंदिरातील संशयास्पद वस्तूचा शोध घेण्यासाठी तातडीने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. भाऊसिंगजी रोडवरून येणाऱ्या श्वानपथकाची व्हॅन गर्दीत अडकली. महापालिकेपासून भवानी मंडपापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झालेले बेशिस्त पार्किंग आणि वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना श्वानपथकाला कसरत करावी लागली.