राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, ७२१२ क्यूसेकने विसर्ग सुरु; कोल्हापुरात महापुराची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:54 AM2024-07-25T11:54:34+5:302024-07-25T12:04:30+5:30

शिवाजी पूल वाहतुकीस बंद

An automatic gate of Radhanagari Dam will open, the flood situation in Kolhapur will be critical | राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, ७२१२ क्यूसेकने विसर्ग सुरु; कोल्हापुरात महापुराची स्थिती

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, ७२१२ क्यूसेकने विसर्ग सुरु; कोल्हापुरात महापुराची स्थिती

कोल्हापूर/राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धरणपाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने राधानगरी, काळम्मावाडी, वारणा धरण पाणीपातळीत वाढ होत असून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यानच आज, बुधवारी सकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले. विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होवून महापुराची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. ३, ४, ६ व ६ उघडले आहेत. यातून ५७१२ क्युसेक व विज निर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक असा एकूण ७२१२ क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. गेले सात आठ दिवस पाटबंधारे  विभागाकडून वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग चालू केला होता. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले. किंबहुना राधानगरी धरणाचे दरवाजे मागील आठवड्यात उघडले असते तर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असती. सद्या राधागनरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वारणा धरणातून प्रतिसेकंद ८८७४ घनफूट, तर दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू केल्याने सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ‘पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे. तब्बल ६५ मार्ग व ८१ बंधाऱ्यांवर पाणी आल्याने निम्म्या जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम दूध व भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे.

दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून १००० क्यूसेक्स विसर्ग 

काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी  नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून १००० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याची वाढ होणार असल्याने या नदीपात्रावरील जवळपास सात बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूधगंगा नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काळम्मावाडी धरण प्रकल्पात ७४.५९ टक्के म्हणजे १८.९४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

शिवाजी पूल वाहतुकीस बंद

पंचगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील वाघबीळ ते शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रात्री पोलिसांनी कोल्हापूरच्या बाजूला बॅरिकेडस लावून रस्ता बंद केला. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गासाठी वाघबीळ, पन्हाळा रस्ता, कासारवाडी, टोप आणि बोरपाडळे, वाठार तर्फ वडगाव असा रस्ता सुरू आहे.

एसटीचे २० मार्ग बंद

महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बुधवारी एसटीचे २१ मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गांचा समावेश आहे.

बुधवारची स्थलांतरित कुटुंबे..

महापालिका हद्दीतील : ३३
नागरिकांची संख्या : १७३
आंबर्डे, पन्हाळा तालुका : २
नागरिकांची संख्या : १६
करवीर तालुका : ६४
नागरिकांची संख्या : २४१
इंगळी, शिरोली (हातकणंगले) : ६
नागरिकांची संख्या : ५३

Web Title: An automatic gate of Radhanagari Dam will open, the flood situation in Kolhapur will be critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.