Kolhapur- चवताळलेल्या हत्तीने कार फोडली, ३०० फूट फरफटत शेतात फेकली; नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 01:16 PM2023-09-15T13:16:26+5:302023-09-15T13:16:41+5:30
परिसरातील भात शेतीचे हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरूच
पेरणोली : देऊळवाडी (ता. आजरा) येथे हत्तीने हणमंत सावंत यांनी घरासमोर लावलेली कार कुटुंबाच्या डोळ्यासमोर फरफटत नेत शेजारील भात शेतीत फेकून देऊन तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठ दिवसांपासून हत्ती चित्री प्रकल्पाशेजारील गावात धुमाकूळ घालत आहे. देऊळवाडी, खानापूर, इटे, रायवाडा गावातील वसाहतीमधून हत्ती फेरफटका मारत आहे. बुधवारी रात्री देऊळवाडी गावात हत्ती फेरफटका मारत असताना हणमंत सावंत यांनी दारात लावलेली अल्टो कार सोंडीतून उचलली. रात्री बाराच्या दरम्यान बाहेर आवाज आल्याने सावंत यांनी खिडकीतून पाहिले असता हत्ती कारला फरफटत समोरील उसाकडे नेत असल्याचे दिसले. उसातून शेजारी ३०० फूट असणाऱ्या भात शेतात कार नेऊन फेकली. यावेळी हताशपणे पाहण्याशिवाय सावंत यांच्याकडे पर्याय राहिला नाही. हत्ती आता थेट गावातच येत असल्याने शाळकरी मुले व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
खानापूर तलावात व चित्री प्रकल्पात भरपूर पाणी असल्याने प्रकल्पातील पाण्यात डुबून परिसरातील भात शेतीचे हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरू आहे. भात नुकसानीसोबत आता हत्ती कार व यंत्राचेही नुकसान करत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.
दुसरी घटना
३ वर्षांपूर्वी इटे येथील शिक्षक पांडुरंग सुकवे यांची कार हत्तीने फोडली होती. त्यानंतर त्याच गावाशेजारी देऊळवाडीत सावंत यांची कार फेकली आहे. ही एकाच परिसरातील दुसरी घटना घडली आहे.