मोबाइलवर कर्ज मिळवून देतो सांगून १५ लाखांचा गंडा, कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील शॉपीमधील कर्मचाऱ्याचा उद्योग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 12:19 PM2024-07-13T12:19:57+5:302024-07-13T12:22:03+5:30

पन्हाळा, हातकणंगलेसह इचलकरंजीतील रहिवासी

an employee of a mobile shop cheated 15 lakhs by claiming to get a loan on a mobile phone In Kolhapur | मोबाइलवर कर्ज मिळवून देतो सांगून १५ लाखांचा गंडा, कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील शॉपीमधील कर्मचाऱ्याचा उद्योग 

मोबाइलवर कर्ज मिळवून देतो सांगून १५ लाखांचा गंडा, कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील शॉपीमधील कर्मचाऱ्याचा उद्योग 

कोल्हापूर : मोबाइल खरेदी केल्यास पंचवीस टक्के रक्कम कपात करून तत्काळ कर्ज मिळवून देतो, अशा भूलथापा मारून मोबाइल विक्री प्रतिनिधी आणि एजंटाने संगनमत करून जिल्ह्यातील पंधरा जणांना १५ लाख ३ हजार ९०० रुपयांचा गंडा घातला. लक्ष्मीपुरीतील मोबाइल दुकानातील मोबाइल विक्री प्रतिनिधी अनिकेत प्रकाश चिपरे (वय ३१, रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर ) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. एजंट गणेश जाधव (रा. नंदनवन पार्क, कोल्हापूर) हा अद्याप पसार आहे. या प्रकरणी उमेश आनंदराव भोसले (४०, रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले की, फसवणुकीचा हा प्रकार २६ फेब्रुवारी ते १८ मार्च, २०२४ या कालावधीत लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी परिसरातील मोबाइल शॉपीत घडला. फिर्यादी भोसले यांना पैशाची गरज होती. संशयित गणेश जाधव हा मोबाइल खरेदीवर तत्काळ कर्ज मिळवून देतो, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांकडून मिळाली. त्यांनी जाधव याच्याशी संपर्क साधला. जाधवने अनिकेत चिपरे याच्याशी त्याची ओळख करून दिली. 

मोबाइल खरेदी केल्यास त्यातील २५ टक्के रक्कम कपात करून उर्वरित रक्कम धनादेशद्वारे दिली जाईल. कर्जाचे हप्ते तुम्हाला भरावे लागतील, असे त्याने भोसले यांना सांगितले. त्यानुसार मोबाइल खरेदीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे दिली. सिबील स्कोर खराब असल्याने जादा रकमेचे कर्ज मंजूर होऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्या नावावर १ लाख ७५ हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केला. पैकी त्यांना १ लाख ४४ हजार रुपये देण्याचे ठरले. दोन ते तीन दिवसांनंतर धनादेश देतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर धनादेश देण्यास दोघांनीही टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे समजताच भोसले यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

चिपरे आणि जाधव या दोघांनी संगनमत करून या प्रकारेच जिल्ह्यातील पंधराजणांचा विश्वास संपादन केला. कर्ज घेणाऱ्याच्या नावांवर फायनान्स कंपन्याकडून कर्ज मिळवून मोबाइल फोन खरेदी करून सर्वांची एकत्रित १५ लाख ३ हजार ९०० रुपयांची रक्कम काढली. त्यांच्या नावावर घेतलेले मोबाइल अन्य ग्राहकांना विकले. त्यातून मिळालेली रक्कम दोघांनी परस्पर वापरली. दरम्यान, चिपरे याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

फसवणूक झालेल्यांची नावे

सुप्रिया भोसले, संतोष दाभाडे, कृष्णात महापुरे, गणपतराव माने (सर्व रा. आरळे, ता. पन्हाळा), सुभाष बनपट्टे, जगन्नाथ वडर, सुलभा मोरे, जगन्नाथ वडर, सुलभा मोरे, दीपक गोसावी, (सर्व रा. कोडोली) सूरज सनंदे (जाखले, ता. पन्हाळा), जीवन कांबळे (सैदापूर, ता. पन्हाळा), महादेव पाटील (पारगांव, ता. हातकणंगले), अक्षय गायकवाड (रा. पाडळी, ता. हातकणंगले), प्रशिककुमार कांबळे, अमर चव्हाण (रा. इचलकरंजी)

दुकान मालकाचीही तक्रार

आमच्या दुकानाची बदनामी झाली आहे, अशी तक्रार संबंधित मोबाइल शॉपीच्या मालकाने एप्रिलमध्ये लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. दुकानात काम करणारा मोबाइल विक्री प्रतिनिधी करीत असलेली फसवणूक माहिती नव्हती. दुकानाला मिळालेला फायनान्सचा कोडही बंद झाला आहे, असा तक्रार अर्ज शॉपी मालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आय फोन पडला महाग

दोन दिवसांत कर्ज मिळते म्हणून संबंधित प्रतिनिधीने पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाइलवर आलेला ओटीपी घेऊन फसवणूक केली. कर्जासाठी आलेल्यांकडून शॉपीमध्येच त्यांचे मोबाइलचा बॉक्स देऊन छायाचित्र घेतले आहे. त्यांच्या कागदावर स्वाक्षरी घेतल्या. संशयित दोघांनी काहींच्या नावे आयफोन घेतले आहेत. त्यांची किंमत पन्नास हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत आहे.

Web Title: an employee of a mobile shop cheated 15 lakhs by claiming to get a loan on a mobile phone In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.