Kolhapur: मोजणीसाठी आले अन् ठेच लागून विहिरीत पडले, भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:15 AM2023-04-18T11:15:21+5:302023-04-18T11:15:36+5:30
दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
हातकणगले : रुई (ता. हातकणंगले) येथे शेतजमीन मोजणी करण्यासाठी गेलेले भूमी अभिलेखचे कर्मचारी राजेंद्र रामचंद्र कोळी (वय ४५ रा.आष्टा ता.वाळवा) यांचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रुई येथे गावालगतच गडकरी यांची विहीर आहे. गट नंबर ३३९च्या शेतजमीन मोजणीसाठी हातकणंगले येथील भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले होते. जमिनीच्या हद्दीची खातरजमा समजून घेण्यासाठी कर्मचारी पायवाटेने जात असताना राजेंद्र कोळी यांना ठेच लागली. त्यांचा तोल जाऊन ते विहिरीच्या दगडी कठड्यावर कोसळले.
यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागून ते बेशुद्ध पडले. जखमी झाल्याने ते सुमारे ५० फूट खोल पाण्यात पडले. विहिरीत पाणी आणि गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने, शोधमोहिमेला अडचण येत होती. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी विहिरीत उतरून शोधण्याचा प्रयत्न केला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह सापडला. मृतदेहाची उतरिय तपासणी हातकणंगले ग्रामिण रुग्णालयामध्ये करण्यात आली.