कोल्हापूर: भुयेवाडीत मंदिराच्या पायरीवर आढळले अर्भक, परिसरात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:12 PM2022-06-14T12:12:24+5:302022-06-14T12:22:21+5:30
एका बॉक्समध्ये ठेवले होते हे अर्भक
शिरोली : भुयेवाडी (ता. करवीर) येथील भागीरथी मंदिराच्या पायरीवर आज, मंगळवारी सकाळी षुरुष जातीचे अर्भक आढळून आले. सकाळी पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हे अर्भक निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुयेवाडी येथील भागीरथी माळावर असलेल्या भागीरथी मंदिरात दिलीप पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास पूजा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ कृष्णात पाटील व त्यांचा भाचा दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी कृष्णात यांच्या भाच्याच्या निदर्शनास एक बॉक्स आला. तो बॉक्स त्या मुलाने उघडून पाहिला. तर त्याला लहान मुल दिसले. त्याने आपले मामा स्थानिक येथील लोकांना ते दाखवले असता यामध्ये लहान मुलगा जिवंत असल्याचे निदर्शनास आले.
ग्रामस्थांनी व भुयेवाडीचे पोलीस पाटील विश्वास पाटील यांनी तात्काळ करवीर पोलिसांना फोन करून सदर माहिती सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता बॉक्समध्ये अर्भक असल्याचे दिसले. ते बाहेर काढल्यानंतर रडू लागले. हे अर्भक दोन दिवसाचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या अर्भकास पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.