उपचारासाठी आणलेल्या कैद्याने सीपीआरमधून ठोकली धूम, कोल्हापूर पोलिसांची उडाली तारांबळ
By उद्धव गोडसे | Published: March 4, 2023 02:34 PM2023-03-04T14:34:12+5:302023-03-04T14:36:12+5:30
पोलिसासह कर्मचारी कैद्याच्या मागे धावले, पण सर्वांची नजर चुकवून झाला पसार
कोल्हापूर : उपचारासाठी सीपीआरमध्ये आणलेला कैदी पोलिसांची नजर चुकवून बेडीसह पळाला. निवास अरविंद व्हनमाने (वय ३७, रा. तासगाव, जि. सांगली) असे पळालेल्या कैद्याचे नाव आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याची रवानगी कळंबा कारागृहात झाली होती. ही घटना शनिवारी (दि. ४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास सीपीआरमध्ये आणले होते. साध्या वेशात आणि हातात बेडी घातलेला कैदी व्हनमाने याला एक पोलिस उपचार कक्षात घेऊन गेले. उपचारानंतर वैद्यकीय अधिका-यांनी कैद्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर ड्युटीवरील पोलिस कागदपत्रे घेण्यासाठी डॉक्टरांच्या कक्षात जाताच व्हरांड्यात उभ्या असलेल्या कैद्याने धूम ठोकली. हा प्रकार लक्षात येताच रुग्णालयातील महिला कर्मचा-यांनी कैदी पळाला, कैदी पळाला... असा आरडाओरडा केला.
पोलिसासह कर्मचारी कैद्याच्या मागे धावले, पण सर्वांची नजर चुकवून तो पीएम रूमच्या दिशेने पळाला. पीएम रूमच्या बाजुला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून तो दसरा चौकातून पळाला. कैदी पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सीपीआरमध्ये शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी दसरा चौकासह शहरातील प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कैद्याचा शोध सुरू केला.