Kolhapur- दूधगंगा प्रकल्प: मान्यतेआधीच ४० कोटी दिल्याची चौकशी रखडली
By समीर देशपांडे | Published: December 28, 2023 01:53 PM2023-12-28T13:53:01+5:302023-12-28T13:53:20+5:30
आतापर्यंत पाच हजार कागद चौकशी समितीकडे
समीर देशपांडे
कोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) जलसिंचन प्रकल्पाच्या १६२ कोटींच्या डाव्या कालव्याच्या कामात मान्यतेविनाच ठेकेदाराला ४० कोटी रुपये अदा केल्याप्रकरणाची चौकशी पाच महिने झाले तरी अजूनही सुरूच आहे. समितीचे अध्यक्ष जळगाव येथून हे चौकशीचे काम पाहत असून, कोल्हापूरमधून आतापर्यंत पाच हजारहून अधिक कागद चौकशीकामी मागवून घेण्यात आली आहेत. प्रत्यक्षात चौकशी समितीचे अध्यक्ष अणि समिती या कामी अजूनही कोल्हापूरला आलेली नाही.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा मुंबईतील विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारी अभियंता विनया बदामी यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. दूधगंगा प्रकल्पाचा डावा कालवा ७६ किलोमीटरचा आहे. यातील ३२ ते ७६ किमी कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.
या प्रकरणी दक्षता पथक, पुणे यांचा प्राथमिक अहवाल ७ ऑगस्ट २०२० रोजी सरकारला प्राप्त झाला. या प्रकरणात अनियमितता आणि अधिकचा निधी दिल्याचे सिद्ध झाले. तांत्रिक मान्यता घेऊनच याचे बिल अदा करण्याची अट दुर्लक्षित करून ठेकेदाराला ४० कोटी रुपये अदा केल्याने संबंधित कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंता बोरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांना एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते.
आधीच प्रकरण जुने
आधीच हे प्रकरण जुने आहे. अशात चौकशीलाही विलंब होत आहे. कागदपत्रे मागवून घेण्यापेक्षा चौकशी समितीच कोल्हापुरात आली असती तर अहवाल लवकर झाला असता. परंतु, या चौकशी समितीला मुदतवाढ दिली आहे की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही.
बदामी यांच्या निलंबनाबाबत..
विनया बदामी यांनी निलंबनाविरोधात ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. यावर सुनावण्या होऊन याबाबतचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील पुनरावलोकन समितीने घ्यावा, असे आदेश ‘मॅट’ने दिले आहेत. त्यानुसार आता २ जानेवारी २०२४ रोजी याबाबत बैठक होणार आहे.
या प्रकरणी अंतरिम अहवाल दिला आहे. अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. चौकशी समिती कोल्हापूरला येणार का किंवा कसे, याबाबत मी फारसे सांगू शकणार नाही. - ज. द. बोरकर, चौकशी समितीचे अध्यक्ष, मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ