पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:29 AM2022-12-16T11:29:27+5:302022-12-16T11:36:16+5:30
पीडितेने दिला आत्महत्येचा इशारा
पन्हाळा : पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन थेट पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रताप केला आहे. याबाबत पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे गुरुवारी (दि. १५) तक्रार अर्ज दिला आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या काळ्या चाळ्यांमुळे हे पोलिस ठाणे सध्या बदनाम झाले आहे.
पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पन्हाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या महिलेने गुरुवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. असहायतेचा गैरफायदा घेऊन अधिकारी त्रास देतात. विनाकारण लगट करतात. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने रोज सकाळी तोकड्या चड्डीत ते पोलिस ठाण्यात येऊन अनावश्यक प्रश्न विचारतात. महिला कर्मचाऱ्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करतात. पीडित महिलेकडे त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याची मागणी धुडकावून लावल्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला जात आहे.
पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, तातडीने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. अधिकाऱ्यानेच महिला कर्मचान्याशी गैरवर्तन केल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पीडितेने दिला आत्महत्येचा इशारा
- अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्या पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
- योग्य न्याय मिळाला नाही, तर पोलिस महासंचालकांपर्यंत तक्रार देऊन मुलासह आत्महत्या करण्याचा इशाराही पीडित महिलेने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.