Kolhapur: शिवनाकवाडीतील विषबाधा, वृद्धाचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:40 IST2025-02-13T12:39:56+5:302025-02-13T12:40:14+5:30
कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा होऊन उपचार सुरू असताना सीपीआर रुग्णालयात वृद्धाचा मंगळवारी (दि. ११) ...

Kolhapur: शिवनाकवाडीतील विषबाधा, वृद्धाचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा
कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा होऊन उपचार सुरू असताना सीपीआर रुग्णालयात वृद्धाचा मंगळवारी (दि. ११) मृत्यू झाला. बाळासो सदू आरगे (६२) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मृत आरगे यांना मधुमेह, थायरॉईड, किडनीचा विकार होता. या आजारातून त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
गत आठवड्यात गावच्या कल्याणताई देवीच्या यात्रेत महाप्रसादातून ७०० हून अधिक जणांना विषबाधा झाली होती. आरोग्य विभागाने गावात उपचार केंद्र सुरू केले होते. गंभीर रुग्णांवर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात, तसेच काहीजण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
बहुतेक सर्वच रुग्ण उपचार घेऊन डिस्चार्ज घेतल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, विषबाधा झाल्याने उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आरगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
अन्नाच्या अहवालाची प्रतीक्षा
अन्नातून विषबाधा झाल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने घटनेनंतर महाप्रसादातील खीर व पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. खिरीचा अहवाल आला नसला तरी पिण्याच्या पाण्याचा तपासणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, पाण्यात दोष नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खिरीचा अहवाल काय येतो याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे.
मृत बाळासो आरगे यांना विषबाधा झाली असली तरी त्यांना मधुमेह, किडनी, थायरॉईडचा विकार होता. ७२ तासांनंतर विषबाधा विषय संपलेला असतो. त्यामुळे आरगे यांचा त्यांच्या इतर आजारामुळेच मृत्यू झाला आहे. - डॉ. पांडुरंग खटावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरोळ