Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 03:27 PM2024-09-10T15:27:06+5:302024-09-10T15:27:56+5:30
स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ?
चंदगड : अनेकवेळा मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ता व इतर सुविधांअभावी चंदगड तालुक्यातील अनेक धनगरवाडे उपेक्षित आहेत. याचा फटका अर्धांगवायूचा झटका आलेल्या बुझवडे धनगरवाड्यावरील पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धाला शनिवारी रात्री बसला. त्यामुळे स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ? अशा संतप्त भावना धनगरवाड्यावरील कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहेत.
बुझवडे (कुरणी) धनगरवाड्यावरील नवलू बिरू कस्तुरे (वय ७५) यांना शनिवारी रात्री अर्धांगवायूचा झटका आला; पण धो-धो पाऊस, काट्याकुट्टाची वाट त्यात जंगली श्वापदांचा धोका यामुळे त्या वृद्धाला त्याच्या कुटुंबीयांसह इतरांना उपचाराविना ठेवावे लागले. शेवटी रविवारी सकाळी प्लास्टिकच्या डालग्यात घालून चारजणांच्या मदतीने नवलू यांना मुख्य रस्त्यावर आणून त्यांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले.
यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबू वरक, बयाजी वरक, रामू कोकरे, सखोबा डोईफोडे, संजय कस्तुरे, बीरू कस्तुरे, यमाजी कस्तुरे, विठोबा कस्तुरे, धुलू कस्तुरे, बिरू कस्तुरे, पांडू कस्तुरे यांनी नवलू यांना डालग्यात घालून मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रशासन आजही सुस्तच
स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनंतर अशा दुर्दैवी घटना धनगरवाड्यावरील जनतेच्या वाट्याला कायम आहेत. नेते मात्र निवडणूक आली की आश्वासन देऊन मते घेतात. अन् नंतर सोयीस्करपणे विसरून जातात. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील रस्ते करण्याबाबत अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु नेते आणि प्रशासन मात्र आजही सुस्तच असल्याची खंत यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी व्यक्त केली.