Kolhapur: अंथरुणावर खिळून असलेल्या पत्नीची सेवा करुन थकले, वृद्धाने पत्नीचा खून करुन स्वतःही विष पिले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:49 AM2023-11-28T11:49:47+5:302023-11-28T11:50:20+5:30
गळा दाबून खून केला आणि स्वतःही विषारी औषध घेतले. पण..
कागल (जि. कोल्हापूर) : गेली चार वर्षे दुर्धर आजाराने अंथरुणावर खिळून असलेल्या ७८ वर्षीय पत्नीची सेवाशुश्रूषा करून थकलेल्या आणि स्वतःही अनेक शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या ८२ वर्षीय वृद्धाने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कागलमध्ये घडली.
पार्वती शंकर पाटील (वय ७८) असे मृत महिलेचे नाव असून, शंकर कलगोंडा पाटील (वय ८२, रा. जयसिंगराव पार्क, कागल) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी विविध बाजूंनी तपास केल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शंकर पाटील यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शंकर पाटील हे पत्नी पार्वतीसमवेत जयसिंगराव पार्कात स्वतंत्र राहत होते. पत्नी पार्वती या आजाराने गेली चार वर्षे अंथरुणावर झोपून होत्या. त्यांची सर्व प्रकारची सेवा पती या नात्याने ते करीत होते. मात्र, त्यांचेही वय झाले होते. स्वतःच्या शारीरिक व्याधीने ते त्रस्त झाले होते. २२ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी पत्नीस विषारी औषध दिले. तसेच तिचा गळा दाबून खून केला आणि स्वतःही विषारी औषध घेतले. पण, ते बचावले.
पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. श्वासोच्छ्वास कोंडल्याने मृत्यू असा शवविच्छेदनाचा अहवाल आला. तसेच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. तीही पोलिसांना सापडली. त्यानुसार पती शंकर पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.