Kolhapur: तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श, शेतात गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:02 PM2023-09-27T17:02:50+5:302023-09-27T17:03:06+5:30
दिंडनेर्ली : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दिंडनेर्ली(ता.करवीर) येथे शेतात भांगलणी साठी गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच ...
दिंडनेर्ली : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दिंडनेर्ली(ता.करवीर) येथे शेतात भांगलणी साठी गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. गंगुबाई दत्तात्रय वाडकर (वय ६४, रा. हणबरवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इस्पूर्ली पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगुबाई वाडकर या दिंडनेर्ली येथील जावई साताप्पा पाटील यांना शेती कामात मदत करण्यासाठी आल्या होत्या. आज, सकाळीच्या सुमारास त्या बांबर नावाच्या शेतात भात भांगलण करण्यासाठी एकट्या पुढे गेल्या होत्या. काल, मंगळवारी रात्री जोरात पाऊस पडल्याने शेतातील विद्युत पुरवठा करणारी तार तुटून भातात पडली होती. गंगुबाई यांच्या पायांना या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळाने एका शेतकऱ्याला वृध्द महिला शेतात निपचीत पडल्याचे दिसले. संबंधित त्या महिलेला उठवायला जाणार इतक्यात त्याला विद्युत तारा तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. तेव्हा त्याने तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी दिंडनेर्ली व हणबरवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
घटनास्थळी महावितरणचे अभियंता सुभाष पाटील तसेच कर्मचारी, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सी.पी.आर.कडे पाठविण्यात आला. गंगुबाई यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे