अंगडिया व्यावसायिकांना सराफ बंदचा फटका
By admin | Published: March 4, 2016 01:03 AM2016-03-04T01:03:42+5:302016-03-04T01:03:56+5:30
व्यवसाय कोलमडला : शहरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान
तानाजी पोवार -- कोल्हापूर शहरातील सराफ व्यवसाय गेले दोन दिवस बंद आहे. या सराफ व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील अंगडिया कुरिअर सर्व्हिसला गेल्या दोन दिवसांत सुमारे ६५ लाखांचा फटका बसला आहे. सराफ व्यवसाय बंद राहिल्याने पर्यायाने अंगडिया सर्व्हिसही पूर्णत: कोलमडली असल्याने बुधवारी काही प्रमाणात सुरू असलेली ही सेवा गुरुवारी बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याशिवाय जिल्ह्यातील गांधीनगर, इचलकरंजी या ठिकाणीही ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात किमान एक कोटी रुपयांचा फटका बसल्याची
माहिती अंगडिया व्यावसायिकांनी दिली.
केंद्रीय अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सराफ व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापुरातही गेले दोन दिवस सराफ बाजारपेठ बंद स्थितीत आहे. अंगडिया कुरिअर सर्व्हिस पूर्णत: कोलमडली आहे. बुधवार (दि. २) पासून सराफ व्यावसायिकांनी हा बंद पुकारला असला तरी त्या दिवशी सायंकाळी ही सेवा काही प्रमाणात सुरू होती, पण गुरुवारी ही सेवा बंद झाली.
दररोज मुंबईला माल रवाना
कोल्हापुरातून मुंबई बाजारपेठेत दररोज रात्री नऊ वाजता पार्सल पाठविली जातात. कोल्हापुरातून ११ अंगडिया व्यावसायिकांपैकी किमान सहाजणांचे स्वतंत्र टेम्पो अथवा सुमो या चारचाकी वाहनाने माल पाठविला जातो. इतर व्यावसायिकांचे कर्मचारी कमी माल असल्यास दररोज खासगी बसेस अथवा एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करून मुंबईपर्यंत माल पोहोचवितात. गुजरात व इतर ठिकाणी जाणारा माल मुंबईत गेल्यानंतर तेथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो.
विश्वास महत्त्वाचा
कोल्हापूर शहराच्या सराफ बाजारपेठेतून दररोज किमान ३५ ते ४० लाखांची उलाढाल या अंगडिया व्यावसायिकांमार्फत होते. संपूर्ण व्यवसाय हा विश्वासावरच अवलंबून असल्याने अनेक सराफ व्यावसायिकांचे अंगडिया व्यावसायिकांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध जुळले आहेत. त्यामुळे प्रत्येक सराफ व्यावसायिक आपला माल पाठविताना ठरावीकच अंगडिया कुरिअर सर्व्हिसकडेच माल देत असतो. यामध्ये विश्वासाचा दुवा महत्त्वाचा मानला जातो.
बहुतांश व्यावसायिक परप्रांतीय
कोल्हापूर शहरातील सराफ बाजारपेठेत अंगडिया सर्व्हिसमध्ये फक्त एकच महाराष्ट्रीय असून बाकी सर्व व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. तरीही या अंगडिया व्यावसायिकांवर सराफ व्यावसायिकांचा विश्वास जडला आहे, पण अनेक वेळा यातून धोकाही निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मालाचे दर
सराफ बाजारपेठेतून दागिने पाठविताना चांदीचा दर हा किलोवर, तर सोन्याचा दर हा किमतीवर आकारला जातो. चांदीच्या एक किलोच्या दागिन्यावर १०० रुपये, तर सोन्याच्या एक लाखाच्या दागिन्यावर १५० ते २०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो.