आनंद, सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

By admin | Published: March 2, 2017 11:42 PM2017-03-02T23:42:57+5:302017-03-02T23:42:57+5:30

महेश काकडे : स्वत:ला सिद्ध करण्याच्यादृष्टीने परीक्षांकडे पाहावे

Anand, be sure to deal with examinations positively | आनंद, सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

आनंद, सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

Next

बारावीची परीक्षा आता सुरू झाली आहे. यापाठोपाठ दहावी, शालेय ते शिवाजी विद्यापीठ पातळीवरील पदवी, पदवीव्युत्तर परीक्षा होणार आहेत. मार्च आणि एप्रिल हे महिने परीक्षांचे असणार आहेत. या परीक्षांना विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे, त्या कालावधीत काय करावे, करिअरच्यादृष्टीने परीक्षांकडे कसे पाहावे, पालक व शैक्षणिक संस्थांची भूमिका कशी असावी, आदींबाबत शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

परीक्षा विषयक आकडेवारी दृष्टिक्षेपात
शिवाजी विद्यापीठ दोन सत्रांत घेणाऱ्या परीक्षांची संख्या : ११६८
वर्षभरात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या : पावणेसहा लाख
एका सत्रात तपासल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिका : २२ लाख
कोल्हापूर विभागातून यावर्षी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या : १ लाख ३२ हजार २१८
दहावीची परीक्षा देणाऱ्या कोल्हापूर विभागातील यंदाच्या विद्यार्थ्यांची संख्या : १ लाख ४७ हजार २१९

प्रश्न : परीक्षांना कसे सामोरे जावे?
उत्तर : शालेय ते उच्चशिक्षणाचे स्वरूप बदलत आहे. अशा स्थितीत परीक्षा देणे ताण-तणावाचा प्रसंग समजला जात आहे. मानवी संस्कृतीमध्ये वाढत, जगत असताना जीवनातील विविध बाबी वेगळ्या मापदंडावर स्वत:ची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी परीक्षा अनिवार्य आहेत. त्यामुळे परीक्षांचा फारसा बाऊ न करता, तणावमुक्तपणे कार्यरत राहणे आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रातील एखाद्या अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश घेणे, ज्ञान घेणे या टप्प्यांप्रमाणे परीक्षादेखील एक टप्पा आहे. ते लक्षात घेऊन सामोरे जावे. शाळा, महाविद्यालयांत प्रवेश घेतल्याच्या दिवसापासून परीक्षेचे नियोजन करावे. ताण टाळण्यासाठी ते गरजेचे आहे. परीक्षेच्या तयारीकडे दुर्लक्ष करू नये. तयारी योग्य असेल, तर तणाव येणार नाही. अनेक विद्यार्थी हुशार असतात. मात्र, अभ्यासाचे योग्य नियोजन न केल्याने परीक्षेवेळी अभ्यास झाला नसल्याचे सांगतात. त्यात काहीजण परीक्षा देणे टाळतात, तर काहीजणांकडून गैरमार्गांचा अवलंब केला जातो. शैक्षणिक कारकीर्द चांगली राहण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब करणे विद्यार्थ्यांनी टाळणे महत्त्वाचे आहे. अभ्यासासह उजळणीत सातत्य असणे गरजेचे आहे. आनंद, सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जावे.
प्रश्न : परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी काय करावे?
उत्तर : शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापक जे शिकवितात. ते समजून घेण्याबरोबरच त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. त्यातून मिळालेली माहिती, ज्ञानाचा परीक्षेत अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. परीक्षा हा ताण-तणावाचा नव्हे, तर आनंदाचा कालावधी असावा. ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये. अतिरिक्त ताण घेऊ नये. हे वाचायचे राहून गेले, ते सोडवयाचे बाकी राहिले अशा संभ्रमावस्थेत राहू नये. वेळेचे योग्य नियोजन करून उजळणीवर भर द्यावा. जुन्या प्रश्नपत्रिका, नमुना उत्तरपत्रिकांवर नजर टाकावी. परीक्षा एक तंत्र आहे. ते समजून घेऊन त्याला सामोरे जावे. उत्तरांची मांडणी लक्षात घेऊन पेपर सोडवावेत. अनावश्यक लेखन, विसंगत मांडणी टाळावी.
प्रश्न : शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षांची तयारी कशी सुरू आहे?
उत्तर : प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, आदी नऊ विद्याशाखांतील १८६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. सुमारे पावणेसहा लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. वार्षिक स्वरुपातील परीक्षा आठ, तर सत्र पद्धतीच्या परीक्षा ४२ दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. सध्या उन्हाळी सत्रातील परीक्षांचे अर्ज भरून घेणे, प्रश्नपत्रिका तयार करून त्यांच्या निवडीचे काम सुरू आहे. उत्तरपत्रिका केंद्रावर पोहोचविल्या आहेत. बैठक क्रमांक, व्यवस्थेचे नियोजन सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेत माहिती-तंत्रज्ञानाचा टप्प्याटप्याने विद्यापीठाकडून वापर वाढविला जात आहे. उन्हाळी सत्रात साडेतीन हजार प्रश्नपत्रिका सिक्युर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी या यंत्रणेद्वारे (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण) पाठविण्यात येणार आहेत. त्यात व्यावसायिक, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेतील बी.कॉम. या पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी या यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. परीक्षा अर्ज, त्याचे शुल्क भरून घेणे, प्रवेशपत्र देणे, प्रश्नपत्रिका पाठविणे, निकाल जाहीर करणे ते पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात देण्याच्या टप्प्यांपर्यंत विद्यापीठ आता माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. एका क्लिकवर विद्यार्थ्यांची सर्व निकाल, पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी केंद्रित स्वरुपामध्ये परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यासह चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सुरू केली आहे. कमीत कमी वेळेत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याकडे विद्यापीठ पावले टाकत आहे.
प्रश्न : पालक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांची भूमिका कशी असावी?
उत्तर : आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी परीक्षा या अनिवार्य आहेत. आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर विविध स्वरुपांतील परीक्षांना सामोरे जावे लागते. सध्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांनाच परीक्षांची अधिक भीती असल्याचे दिसून येते. पहिल्यांदा पालकांनी भीती आणि तणावमुक्त राहावे. आपल्या पाल्याच्या करिअरचा कल, क्षमता लक्षात घेऊन त्याला पाठबळ द्यावे. अमूक इतके गुण, तमुक इतकी टक्केवारी मिळालीच पाहिजे याचा अट्टाहास धरू नये. पाल्यांनी योग्य वेळेत परीक्षेची तयारी करावी यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांनी राहावे. आजच्या बदलत्या, स्पर्धात्मक जगात चांगल्या रोजगाराच्या विपुल संधी, उच्चशिक्षणाची अनेक द्वारे उघडली आहेत. या संधी साधण्यासह उच्चशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम होण्यासाठी परीक्षा देणे अनिवार्य आहे. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तयारी करावी. करिअरच्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी आनंद, ऊर्जा आणि सकारात्मकतेने परीक्षांकडे पाहावे. शाळा, महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांनी परीक्षा या शिक्षण प्रवासातील अविभाज्य भाग आहे. या प्रवासातील गुणवत्ता तपासणीचा थांबा म्हणजे परीक्षा असल्याचे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले पाहिजे. त्याचे नेहमी विद्यार्थ्यांमध्ये भान राहील यासाठी प्रयत्न करावेत.
- संतोष मिठारी

Web Title: Anand, be sure to deal with examinations positively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.