शाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:10 PM2019-06-21T13:10:16+5:302019-06-21T13:12:14+5:30

राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्यावर केलेले ऋण आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि स्नेहाच्या धाग्याने कोल्हापूर आणि उत्तरप्रदेश जोडले आहे. आपल्या ऋणात राहण्यातच आम्हाला आनंद आहे. महाराजांच्या विचारांनीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी केले.

Anand - Kailaschandra Patel: Rajarshi Gratefulness Council | शाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी कृतज्ञता परिषदेत डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इंद्रजित सावंत, कैलासचंद्र पटेल, उपमहापौर भूपाल शेटे, महापौर सरिता मोरे, वसंतराव मुळीक, अ‍ॅड. शशिकांत सचान, बबन रानगे, गणी आजरेकर उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देशाहू महाराजांच्या ऋणात राहण्यातच आनंद- कैलासचंद्र पटेल : राजर्षी कृतज्ञता परिषद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्यावर केलेले ऋण आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि स्नेहाच्या धाग्याने कोल्हापूर आणि उत्तरप्रदेश जोडले आहे. आपल्या ऋणात राहण्यातच आम्हाला आनंद आहे. महाराजांच्या विचारांनीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे मंडल अध्यक्ष कैलासचंद्र पटेल यांनी केले.

शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित ‘राजर्षी कृतज्ञता परिषदे’त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे डॉ. राजकुमार सचान, अ‍ॅड. शशिकांत सचान, संजेशकुमार कटियार, गणी आजरेकर उपस्थित होते.

पटेल म्हणाले, बहुजनांना शिक्षण, स्त्रीउद्धार, जातिभेदांचा नाश करण्यासाठी झटणारे शाहू महाराज सर्वसमावेशक विकासाचे रोल मॉडेल होते. त्याकाळी ब्रिटिशांसोबत संघर्ष करत असलेल्या कुर्मी समाजाकडून त्यांनी सन्मान स्वीकारला, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अलौकिक प्रतिभा आणि त्यागातूनच ते राजर्षी झाले. आज जातीच्या आधारावर देशाचे राजकारण आणि शिक्षण आधारलेले असताना महाराजांच्या विचाराने देशाची वाटचाल होणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्याचा आणि कोल्हापूरचा वारसा भारतभर पोहोचावा.

यावेळी महापौर सरिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, शाहू महाराजांनी ५५० एकर जागा कुष्ठरोग्यांसाठी दिली. ही जागा धनदांडग्यांनी बळकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र आम्ही तो हाणून पाडला. आता नर्सरी बागेतील शाहूराजांच्या समाधिस्थळासाठी शासनाने दमडीची मदत केली नाही. महापालिकेने आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च केले असून, सात कोटी रुपयांच्या निधीतून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समाधिस्थळ होईल.
अ‍ॅड. शशिकांत सचान म्हणाले, कानपूर महाविद्यालयाला शाहूंचे नाव देण्यात आले आहे. हे महाविद्यालय नेत्रदीपक प्रगती करीत आहे. मात्र कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल इतिहासकारांनी फार लिहिले नाही, याचा खेद आहे. अध्यक्षीय भाषणात शाहू छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वापर भाषणांपुरता न करता प्रत्येकाने ते आचरणात आणले पाहिजेत. जातीच्या राजकारणावरून समाजात फूट पडत असताना सर्वांनी एकोपा राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी व्यंकाप्पा भोसले, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, माजी महापौर भिकशेट पाटील, सतीश रणदिवे, डॉ. पद्मा पाटील, गंगाराम कांबळे कुटुंबीय यांना राजर्षी शाहू सन्मान देऊन गौरविण्यात आले. तसेच शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतिगृहे, संस्था, संशोधन केंद्रे या संस्थांचा राजर्षी शाहू सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इंद्रजित सावंत यांनी परिषदेची रूपरेषा सांगितली. बबन रानगे यांनी स्वागत केले. निमंत्रक वसंत मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पद्मा पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

 

 

Web Title: Anand - Kailaschandra Patel: Rajarshi Gratefulness Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.