कोल्हापूरचे प्रेक्षक आनंद लुटणारे
By admin | Published: December 28, 2014 12:26 AM2014-12-28T00:26:06+5:302014-12-28T00:28:18+5:30
सयाजी शिंदे : चित्रपट महोत्सवात ‘खाली डोकं, वरती पाय’ला तीन पारितोषिके
कोल्हापूर : ‘कोल्हापूरचे प्रेक्षक नंबर एकचे लुटारू आहेत. ते नेहमी चांगल्या गोष्टींचा पुरेपूर, मनमुराद आनंद लुटत असतात,’ अशी मिश्कील टिप्पणी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज, शनिवारी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलताना केली. या चित्रपट महोत्सवात ‘खाली डोकं, वरती पाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन पुरस्कार मिळाले.
गेले आठ दिवस येथील शाहू स्मारक भवनात पार पडलेल्या चित्रपट महोत्सवात ४० लघुपट, तर ५० चित्रपट दाखविण्यात आले. आज या महोत्सवाचा सांगता आणि पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
चित्रपट महोत्सवाची तिकिटे आदल्या वर्षी काढणारा प्रेक्षकही याच कोल्हापुरात पाहायला मिळतो, महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतो, हे प्रेक्षकांचे मोठेपण आहे, असे गौरवोद्गारही सयाजी शिंदे यांनी यावेळी काढले.
बॅँक आॅफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर नंदकुमार पुजारी यांनी कोल्हापूर, कोेल्हापूरचे प्रेक्षक आणि येथील वैशिष्ट्य स्वरचित कवितेतून सांगितले. त्यांच्या कवितेला रसिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
सुभाष भुर्के यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात चंद्रकांत जोशी यांनी चित्रपट महोत्सवाचा आढावा घेत, अशा चित्रपट महोत्सवातून नव्या विचाराच्या, नव्या दमाच्या दिग्दर्शकांना अधिक प्रगल्भता, विचारशक्ती येईल, असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला.
यावेळी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, कन्नड अभिनेत्री ऋतिका, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप बापट यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
या चित्रपट महोत्सवात घेण्यात आलेल्या चित्रपट स्पर्धेचा निकाल दिलीप बापट यांनी घोषित केला. महोत्सवात दाखविण्यात आलेल्या ‘खाली डोकं, वरती पाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ११ हजार रुपये, गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार अजयसिंग याना देण्यात आला; तर बालकलाकार शुभम् मोरे याला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून रफिक बगदादी, अशोक राणे, संस्कार देसाई यांनी काम पाहिले.
महोत्सवात देण्यात आलेले पुरस्कार
४सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शक - तानाजी महादेव घाडगे (चित्रपट - बरड)
४सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुहास पळशीकर (बरड)
४सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - स्मिता तांबे (कॅँडल मार्च) व तेजस्विनी पंडित (सेव्हन रोशन व्हिला)