जालन्यात विद्रोही मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदी आनंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:18 PM2020-03-05T19:18:38+5:302020-03-05T19:21:29+5:30
जालना येथे १४ व १५ मार्च रोजी होणाऱ्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांस्कृतिक तुलनाकार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : जालना येथे १४ व १५ मार्च रोजी होणाऱ्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांस्कृतिक तुलनाकार व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, या संमेलनात जालन्यातील किशोर घोरपडे व नांदेड येथील व्यंकटेश काबदे यांना ‘विद्रोही जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या देशात हिंसेचा उन्माद माजला आहे. जात, धर्म, संस्कृतीचे मुद्दे उपस्थित करून हिंसेचे राजकारण केले जात आहे. अशा काळात ब्राह्मणी भांडवली व पुरुषसत्ताक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणाºया मराठी साहित्य महामंडळ व ते भरवीत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार घालत समतावादी सांस्कृतिक पर्याय विद्रोही सांस्कृतिक चळवळीने उभा केला आहे.
मूळचे कोल्हापूरचे असलेले डॉ. आनंद पाटील हे आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार व लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांची कथा-कादंबऱ्यांशिवाय मराठी दोन व इंग्रजीत एक अशी प्रवासलेखने प्रसिद्ध झाली आहेत. ‘पाटलाची लंडनवारी’चे हिंदी व कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत.
त्यांच्या ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या ग्रंथाने बेस्ट सेलरचा मान मिळविला आहे. त्यांनी आजवर इच्छामरण, कणसं, कडबा, कागूद आणि सावली या कादंबऱ्या लिहिल्या. याशिवाय कथासंग्रह लिहिले आहेत. आनंदपर्व, समग्र बा. सी. मर्ढेकर, शेक्सपीअर यांच्यावर तौलनिक सांस्कृतिक समीक्षा लिहीली आहे. पश्चिमी विषारीकरण, सनातनी देशवाद, संधिसाधू लेखकांवर ते प्रहार करतात.
या संमेलनात परिसंवाद, शाहिरी जलसा, कविसंमेलन व गटचर्चा होणार आहेत. तरी साहित्यप्रेमींनी या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस सचिव यशवंत मकरंद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.