आनंदलहरी अंबाबाई, तिसऱ्या माळेला सालंकृत रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:21 PM2019-10-01T16:21:46+5:302019-10-01T16:27:09+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (मंगळवार)कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीची आनंदलहरी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. रात्री साडे नऊ वाजता देवीचा पालखी सोहळा झाला.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (मंगळवार)कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीची आनंदलहरी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. रात्री साडे नऊ वाजता देवीचा पालखी सोहळा झाला.
मंगळवारी पहाटे काकड आरती, अभिषेक, दुपारची महाआरती झाल्यानंतर अंबाबाईची आनंदलहरी देवी रुपात पूजा बांधण्यात आली. लहरी म्हणजे तरंग, आनंदलहरी म्हणजे आनंदाचे तरंग, आदि शंकराचार्यांनी रचलेले आनंदलहरी हे स्तोत्र वास्तविक सौंदर्यलहरीचाच एक भाग आहे.
सौंदर्यलहरी हे नुसते स्तोत्र नसून त्यामधून त्रिपुरसुंदरीची अंतरंग आणि बहिरंग पूजाविधी उद्धृत केली आहे. आदि शंकराचार्यांनी अंतरंग उपासनेमध्ये त्रिपुरसुंदरी म्हणजे साक्षात कुंडलिनी शक्ति स्वरुप सांगितली आहे. असं मानलं जातं की, आनंदलहरी ही रचना साक्षात शिवाने आचार्यांना सांगितली आणि आचार्यांनी ती उतरवून घेतली. आनंदलहरीमधील श्लोक देवीच्या सगुण स्वरुपाचे वर्णन करतो.
जीने उत्तम असे स्वर्णालंकार आणि सूयार्सारखे तेजस्वी मणी शरीरावर परिधान केलेले आहेत, जीने आपल्या हरणासारख्या डोळ्यांनी साक्षात शिवाला भुरळ पाडली आहे. जी साक्षात विद्युल्लतेसारखी सळसळती आणि तेजस्वी आहे, जिने पीतांबर म्हणजेच पिवळी वस्त्रे परिधान केली आहेत, जीचे पैंजण तिचे सौंदर्य खुलवत आहेत, अशी ती सर्वमयी, कल्याणकारी, स्मितमुखी अपर्णा माझ्यावर आनंदाचा, सुखाचा वर्षाव करो असा त्यांच्या स्तोत्रांचा अर्थ आहे. या वर्णनानुसार मंगळवारची पूजा होती. ही पूजा पराग ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी, पुरुषोत्तम ठाणेकर यांनी बांधली.