जन्मशताब्दीलाही ‘अनंत’ यांच्या भाळी उपेक्षा अनंत...!

By admin | Published: March 22, 2015 01:06 AM2015-03-22T01:06:55+5:302015-03-22T01:12:53+5:30

एकही कार्यक्रम नाही : मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर; मराठीला सर्वाधिक चित्रपट देणाऱ्या हुकमी दिग्दर्शकाचे साधे स्मारकही नाही

'Anant' to ignore the anniversary of the infinite ...! | जन्मशताब्दीलाही ‘अनंत’ यांच्या भाळी उपेक्षा अनंत...!

जन्मशताब्दीलाही ‘अनंत’ यांच्या भाळी उपेक्षा अनंत...!

Next

संदीप आडनाईक /
इंदुमती गणेश / कोल्हापूर
तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणीच त्यांच्या वाट्याला आली होतीच, पण त्यांच्या मृत्यूनंतरही उपेक्षाच सहन करणाऱ्या मराठी मातीतल्या एका यशस्वी दिग्दर्शकाला त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात त्यांच्याच कलानगरीतील कलावंतानाही विसर पडला आहे.
ते हरकाम्या होते, ते संकलक होते, कला, छायाचित्रण, ध्वनिमुद्रणही करत. प्रसंगी तोंडाला रंग फासून मॉबसिनही करायचे. अभिनय असो की कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन असो की निर्मिती आणि वितरण या सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. चित्रपटक्षेत्रातील एकही विभाग असा नव्हता, की ज्याला त्यांचा परिसस्पर्श लाभलेला नव्हता.
जवळपास ६५ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत अनंत माने यांनी एक, दोन नाही तब्बल ५७ चित्रपट दिले. पुण्यातील चित्रपटसृष्टी बंद पडल्यानंतर मराठी चित्रपटाला अवकळा आली होती. जी स्थिती, पुण्याची तीच परिस्थिती कोल्हापूरची होती. जिथे हिंदी चित्रपट दीड आठवड्याच्या वर चालत नव्हते, तिथे मराठी चित्रपटाने मान टाकली होती. पण अनंत माने यांनी ‘सांगत्ये ऐका’सारखा तमाशाप्रधान चित्रपट केला आणि पुण्यात त्याने तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला, ही करामत केवळ अनंत माने यांच्या दिग्दर्शनाची. आजही या चित्रपटाचा विक्रम एकाही मराठी चित्रपटाने मोडलेला नाही. अनंत माने हिंदीतही नामांकित होते. मनात आणले असते, तर ते मुंबईत राहून लखपती झाले असते. पण त्यांनी आपल्या मायभूमीकडे, कोल्हापुरात चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञही कोल्हापूरचेच घेण्याचा अट्टहास धरला. जे निर्माते मुंबईत शूटींग करण्याचा आग्रह धरत त्यांच्या चित्रपटांना त्यांनी रामराम ठोकला. त्यामुळे १९६0च्या सुमारास त्यांनी कोल्हापुरातच सातत्याने निर्मिती करत मराठी चित्रपटांंना संजीवनी मिळवून दिली.
हिंदी चित्रपटाला चांगले दिवस येताच मराठीकडे पाठ फिरवणाऱ्या मराठी कलाकारांनाही मराठीत काम करायला भाग पाडून मराठी चित्रपटसृष्टीला संजीवनी देण्याचे काम अनंत माने यांच्यासारख्या हरहुन्नरी दिग्दर्शकाने केले. आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीच्याच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रातील कलावंतांना त्यांचा विसर पडावा, हे दु:खदायक आहे.
आज जे कलावंत नाव मिळवित आहेत, ते केवळ आणि केवळ अनंत माने यांच्यामुळेच. पण या साऱ्याच कलाकारांना त्यांचा विसर पडला आहे. हा मराठी मातीचा शापच. अशा कालातीत कलावंतांच्या मुळाशी कसा येतो, हे न सुटणारे कोडे आहे.
एक काळ असा होता, की कलेचे भोक्ते असणाऱ्या राजकीय नेत्यांनी वेळोवेळी कलावंतांचा सन्मान केला आहे. व्ही. शांताराम असोत, की भालजी पेंढारकर, लता मंगेशकर असोत की आशा भोसले, साऱ्या कलाकारांचा यथोचित सन्मान सरकारदरबारी झाला. आजची परिस्थिती पालटली आहे. एकाही राजकीय नेत्याला सरकार दरबारी मराठी चित्रपटांना संजिवनी देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करावा, असे वाटत नाही, ही सांस्कृतिक दिवाळखोरी म्हणावी का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
कोल्हापुरात चित्रनगरीची स्थापना करण्यास कारणीभूत झालेल्या अनंत माने यांच्यासारख्या द्रष्ट्या कलावंताची कोल्हापुरात साधी नावनिशाणीही नाही. कोल्हापूरच्या चित्रनगरीला त्यांचे नाव द्यावे, असेही कधी कोणाला वाटले नाही, त्यांच्या नावाने एखादे सभागृहही नाही, त्यांचा पुतळाही नाही, इतकेच काय, त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या प्रतीही मिळणे आज दुरापास्त झाले आहे.
कोल्हापुरातील एका रस्त्याला, चौकाला त्यांचे नाव महानगरपालिकेने दिले होते, पण आज त्याचा ठावठिकाणा शोधावा लागतो आहे, इतकेच काय, त्यांच्या कुटुंबीयांकडेही त्यांची जुनी छायाचित्रेही उपलब्ध नाहीत. ही स्थिती या गाजलेल्या दिग्दर्शकाच्या नशिबी कशी आली, याला जबाबदार कोण?
मराठी चित्रपटाला एका साच्यात, विशेषत: तमाशाप्रधान चित्रपटात गुरफटून टाकण्याचा आक्षेप अनंत माने यांच्याबाबत घेतला जातो, पण त्यांनी ‘मानिनी’, ‘सुशीला’सारखे सामाजिक आशय देणारे, विनोदी तसेच लोकनाट्याला सन्मान देणारे चित्रपटही दिले. साचेबध्दतेतून मराठीला बाहेर काढून तमाशाला सन्मान देण्याचे काम माने यांनीच केले, हे विसरुन चालणार नाही. आजही अनंत माने यांचे चित्रपट ग्रामीण रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.
राज्य सरकार अनंत माने यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते, पण त्याचा इतका गाजावाजा होत नाही. मराठी चित्रपट महोत्सव होतात, त्यात साधा उल्लेख होत नाही, त्यांच्या नावाचे साधे सभागृह नाही, स्मारक नाही, परिसंवाद होत नाहीत. हे इतके उपेक्षेने मारण्याचे शल्य कलावंत सहन कसा काय करतो, हे समजत नाही.

Web Title: 'Anant' to ignore the anniversary of the infinite ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.